मला देशद्रोही म्हणणाऱ्यांनीच देशाचे तुकडे केले

नवाज शरीफ यांचा लष्करावर थेट हल्लाबोल

इस्लामाबाद- पाकिस्तानातील गुजरानवाला येथे त्या देशातील विरोधी पक्षांच्या झालेल्या संयुक्त सभेत माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी जोरदार हल्लाबोल केला. विशेष म्हणजे टीकेची तोफ डागताना शरीफ यांनी पंतप्रधान इम्रान खान यांना लक्ष्य केलेच. मात्र पाकिस्तानचे कथित सर्वशक्तीमान लष्कर, त्याचे प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा आणि त्यांची कुख्यात संघटना आयएसआयच्या प्रमुखांचेही थेट नाव घेत त्यांच्यावर तोफ डागली.

लोकशाहीसाठी पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी आज गुजरानवाला येथे जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यावेळी व्हिडिओ लींकच्या माध्यमातून भाषण करताना शरीफ यांनी बाजवा यांनाच थेट सवाल केला. पाकिस्तानात आज दोन सरकारे कोणी निर्माण केली आहेत. हे सगळे बाजवाच करत असून तम्ही माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करा, माझी मालमत्ता जप्त करा, मला देशद्रोही ठरवा, मात्र माझ्या देशातील जनतेसाठी मी सत्य बोलतच राहणार आहे असे त्यांनी ठणकावले. या सगळ्या प्रकारांत आयएसआयचे प्रमुख फैज हमीद यांचाही हात असल्याचा आरोप त्यांनी केला.

इम्रान खान यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की पाकिस्तानातील तहरीक ए इन्साफचे सरकार काम करण्यात अपयशी ठरले आहे. या सरकारच्या अकार्यक्षमतेचे मूल्य जनतेला चुकवावे लागत आहे. न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतरही एक हुकुमशहा (परवेज मुशर्रफ) देशाबाहेर पळून जातो आणि एका जननेत्याला दोषी सिध्द करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पाकिस्तानी लष्कराला सवाल करताना ते म्हणाले की लोकनिर्वाचित सरकारला आणि त्यांच्या पंतप्रधानाला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण का करू दिला जात नाही? आपल्या पंतप्रधान पदाच्या कारकीर्दीत विकासाची अनेक कामे करण्यात आली, देशाची प्रगती झाली. मात्र आताच्या इम्रान खान सरकारने त्यावर पाणी फेरले आहे, सगळे बरबाद करून टाकले.
शरीफ यांना देशद्रोही ठरवले जात असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.

हुकुमशहांनी देशाच्या जननेत्यांच्या संदर्भात असे शब्द वापरण्याची ही काही पहिली वेळ नाही. मी देशाचा कायदा आणि घटनेबद्दल बोलायचो म्हणून मला हटवण्यात आले. ज्यांनी देशाची दोन भागांत फाळणी केली ते देशद्रोही आहेत की जो घटनेची आणि कायद्याची गोष्ट करतो तो देशद्रोही आहे, असा प्रश्‍न त्यांनी विचारला

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.