मुंबई – व्होडाफोन आयडिया या मोबाइल सेवा पुरवठादार कंपनीला पहिल्या तिमाहीत 25,460 कोटी रुपयांच्या तोट्याला सामोरे जावे लागले आहे. या घटनाक्रमांमुळे आज या कंपनीच्या शेअरचा भाव 7 टक्क्याने कोसळला.
या अगोदरच्या तिमाहीतही कंपनीला 11,643 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. सर्वोच्च न्यायालयाने एकत्रित महसुलावरील करानुसार या कंपनीला सरकारला मोठी रक्कम देण्यास सांगितले आहे. त्यामुळे ही कंपनी आर्थिक अडचणीत आलेली आहे.
दरम्यान, शेअरबाजारांमध्ये आज खरेदी-विक्रीच्या छोट्या-मोठ्या लाटांनंतर निर्देशांक कालच्या पातळीवर स्थिर राहिले. मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स केवळ 15 अंकांनी वाढून 38,040 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 13 अंकांनी वाढून 11,214 अंकांवर बंद झाला. सरलेला आठवडा भारतीय निर्देशांकासाठी चांगला गेला. या आठवड्यात निर्देशांक 1.5 टक्क्यांनी वाढले. आज ऊर्जा, दूरसंचार व धातू क्षेत्राचे निर्देशांक वाढले तर माहिती तंत्रज्ञान व आरोग्य क्षेत्राचे निर्देशांक कमी झाले.