मुंबई – ग्लेमार्क कंपनीला करोनावरील औषध उत्पादन करण्यासाठी परवानगी मिळाल्यामुळे आज या कंपनीचा शेअर मोठ्या प्रमाणात उसळला. आज एका दिवसात या कंपनीच्या शेअरच्या किमती 27 टक्क्यांनी वाढून 519 रुपये प्रति शेअर या पातळीवर गेल्या. एकवेळ हा शेअर 39 टक्क्यापर्यंत वाढला होता.
दरम्यान चीन सरहद्दीवर तणाव व करोनाचा संसर्ग वाढत असूनही शेअर बाजार निर्देशांक यांची आगेकूच चालू राहिली. सोमवारी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 0.52 टक्क्यांनी म्हणजे 179 अंकांनी वाढून 34,911 अंकावर बंद झाला. एक वेळ हा निर्देशांक 482 अंकापर्यंत वाढला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 66 अंकांनी वाढून 10,311 अंकांवर बंद झाला.
आज झालेल्या खरेदीचा फायदा धातू, ऊर्जा, आरोग्य, बॅंकिंग, दूरसंचार या क्षेत्रांना होऊन या क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर तीन टक्के पर्यंत वाढले. मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये आज दोन टक्क्यांपर्यंत वाढ झाली.
याबाबत बोलताना जिओजी वित्तीय सेवा या संस्थेचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, भारतीय आणि परदेशी गुंतवणूकदारांचा भारताच्या भविष्याबद्दल विश्वास वाढत आहे. त्यामुळे सरहद्दीवर तणाव आणि करोना व्हायरसचा संसर्ग वाढत असूनही गुंतवणूकदार खरेदी करीत आहेत. या तेजीत परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा मोठा सहभाग आहे. या गुंतवणूकदारांनी जून महिन्यात आतापर्यंत 17,985 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.