मुंबई – परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराकडून भारतात गुंतवणूक वाढत असल्यामुळे निर्देशांक उच्च पातळीवर असूनही खरेदी वाढतच आहे. शुक्रवारी बॅंकांच्या शेअरची बरीच खरेदी झाली. त्याचबरोबर अनपेक्षितपणे मोबाइल कंपन्यांचे शेअर वधारले.
बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 353 अंकांनी म्हणजे 0.90 टक्क्यांनी वाढून 39,467 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 88 अंकांनी वाढून 11,647 अंकांवर बंद झाला.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने आणखी सवलती देण्याची शक्यता खुली असल्याचे सांगितल्यानंतर जागतिक शेअरबाजाराचे निर्देशांक वाढले. त्याचाही निर्देशांकांना आधार मिळाला. बॅंकिंग व दूरसंचार क्षेत्राबरोबरच तेल आणि नैसर्गिक वायू, ऊर्जा क्षेत्राचे निर्देशांक 4 टक्क्यांपर्यंत वाढले. मात्र, वाहन, माहिती तंत्रज्ञान, ग्राहक वस्तू क्षेत्रांचे निर्देशांक कमी झाले.
मुंबई शेअरबाजाराचा मिडकॅप 0.55 टक्क्यांनी व स्मॉलकॅप 0.23 टक्क्यांनी वाढले. जागतिक भांडवल सुलभतेमुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ऑगस्ट महिन्यामध्ये भारतीय शेअरबाजारात तब्बल 45 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.