Share Market Today: भारतीय शेअर बाजारात मंगळवारी (२७ जानेवारी) कमालीची अस्थिरता पाहायला मिळाली. सुरुवातीच्या सत्रात घसरणीसह व्यवहार करणाऱ्या बाजाराने शेवटच्या एका तासात जोरदार मुसंडी मारली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ ३१९.७८ अंकांच्या (०.३९%) वाढीसह ८१,८५७.४८ वर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ १२६.७५ अंकांच्या (०.५१%) तेजीसह २५,१७५.४० च्या स्तरावर स्थिरावला. भारत-युरोप व्यापार कराराचा सकारात्मक परिणाम – भारत आणि युरोपीय महासंघ (India-EU) यांच्यातील व्यापार कराराच्या घोषणेमुळे गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला. या सकारात्मक बातमीमुळे मेटल, आयटी, ऑईल अँड गॅस आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांनीही अर्ध्या टक्क्यांची वाढ नोंदवली. गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३ लाख कोटींची भर – बाजार सावरल्याने गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरला. बीएसईमध्ये सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल (Market Cap) ४५१.५६ लाख कोटींवरून वाढून ४५४.५८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. यामुळे एकाच दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे ३.०२ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. सेक्टोरल कामगिरी: मेटल क्षेत्राची चमक – तेजीतील क्षेत्रे: मेटल इंडेक्सने सर्वाधिक ३ टक्क्यांची झेप घेतली. आयटी, बँकिंग आणि ऊर्जा क्षेत्रातील शेअर्समध्येही हिरवळ पाहायला मिळाली. वरील चित्रात तुम्ही उर्वरित सेन्सेक्स समभागांची कामगिरी पाहू शकता. घसरणीतील क्षेत्रे: ऑटो, एफएमसीजी (FMCG), मीडिया आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रावर विक्रीचा दबाव राहिल्याने हे निर्देशांक लाल निशाणीत बंद झाले. तेजी-मंदीतील आघाडीचे शेअर्स – नफा मिळवून देणारे पाच शेअर्स: १. अदाणी पोर्ट्स (४.४७%) २. ॲक्सिस बँक (४.३१%) ३. टाटा स्टील ४. टेक महिंद्रा ५. एनटीपीसी घसरण झालेले पाच शेअर्स: १. महिंद्रा अँड महिंद्रा (-४.१९%) २. कोटक महिंद्रा बँक ३. एशियन पेंट्स ४. इटर्नल ५. मारुती सुझुकी दरम्यान, आज बीएसईवर एकूण ४,४७३ शेअर्समध्ये व्यवहार झाले. त्यापैकी १,९४७ शेअर्स वाढीसह बंद झाले, तर २,३४५ शेअर्समध्ये घसरण नोंदवण्यात आली. १८१ शेअर्सच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही. विशेष म्हणजे, ८० शेअर्सनी आपला ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला, तर ६६३ शेअर्सनी नीचांकी स्तर गाठला. हेही वाचा – राज्य मंत्रीमंडळ बैठकीतले ५ मोठे निर्णय; कंत्राटदारांना मोठा दिलासा, जाणून घ्या