मुंबई : रिलायन्स इंड्स्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्याकडून एक मोठी घोषणा करण्यात आली. कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोनस शेअरच्या प्रस्तावावर विचार करणार आहोत. जर याला मंजुरी मिळाली तर रिलायन्सच्या शेअर धारकांना प्रत्येक शेअरच्या बदल्यात एक शेअर बोनस मिळेल. सध्या रिलायन्सचा शेअर ३ हजार ७० रुपयांवर आहे.
रिलायन्सच्या या निर्णयामुळे शेअरधारकांना मोठा फायदा होणार आहे. बोनस इश्यू सर्वसामान्य पणे कंपन्यांकडून शेअरधारकांना पुरस्कृत करण्यासाठी आणि शेअरची लिक्विडीट वाढवण्यासाठी केला जातो. रिलायन्सने त्यांच्या या महत्त्वाच्या योजनेची माहिती स्टॉक एक्स्चेंजला दिली आहे. यामुळे गुंतवणूकदार आणि बाजारात मोठ्या हालचाली सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल बोनस शेअर काय असतो? तो का दिला जातो? त्याबद्दल आज आपण थोडक्यात जाणून घेऊया…
बोनस शेअर काय असतात?
कंपनी सध्याच्या शेअरधारकांना अतिरिक्त शेअर देते. हे शेअर कंपनीच्या लाभांशाच्या स्वरुपात दिले जात नाहीत तर कंपनीकडून राखीव पद्धतीने दिले जातात. जेव्हा एखादी कंपनी बोनस शेअर जारी करते तर त्यामुळे त्यांच्या सध्याच्या शेअर्सची संख्या वाढते. पण कंपनीच्या एकूण संपत्तीत कोणताही बदल होत नाही.
बोनस शेअर का दिले जातात?
शेअर्सची किंमत कमी करण्यासाठी बोनस शेअर दिले जातात. जेव्हा एखाद्या कंपनीचे बाजारमूल्य वाढते तेव्हा लहान गुंतवणूकदारांना खरेदी करणं कठीण होऊन जातं. बोनस जारी करून कंपनी शेअरच्या किंमती कमी करू शकते. यामुळे लोकांना हे खूप सोपं होऊन जातं. याशिवाय शेअरधारकांना खूश करण्यासाठी आणि त्यांचा विश्वास वाढावा यासाठी कंपनी निर्णय घेत असते.