Share Market | भारतीय शेअर बाजारात मागील काही दिवसांपासून सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. परंतु, असे काही शेअर्स आहेत, ज्याच्या किंमतीत मागील काही दिवसात मोठी वाढ झाली आहे. तसेच, काही कंपन्यांकडून गुंतवणूकदारांना डिव्हिडेंडही दिला जात आहे. Procter & Gamble Hygiene and Health Care Ltd या कंपनीने डिव्हिडेंडची घोषणा केली आहे.
Procter & Gamble Hygiene and Health Care Ltd ही कंपनी प्रत्येक शेअरवर 110 रुपये डिव्हिडेंड देणार आहे. यासाठीची रेकॉर्ड डेटही याच महिन्यातील ठरवण्यात आली आहे.
या कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 10 रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या एका शेअरवर 110 रुपये डिव्हिडेंड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीने डिव्हिडेंडसाठी 20 फेब्रुवारी ही रेकॉर्ड डेट ठरवली आहे. म्हणजेच, ज्यांच्याकडे या तारखेपर्यंत कंपनीचे शेअर्स असतील त्यांनाच डिव्हिडेंडचा लाभ मिळेल. कंपनी गुंतवणूकदारांना 7 मार्च किंवा त्यापूर्वी डिव्हिडेंड देणार आहे.
Procter & Gamble Hygiene and Health Care Ltd कडून सातत्याने गुंतवणूकदारांना डिव्हिडेंड दिला जातो. कंपनीने मागील वर्षी 2 वेळा डिव्हिडेंड दिला होता. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात कंपनीने गुंतवणूकदारांना एका शेअरवर 95 रुपये डिव्हिडेंड दिला होता. फेब्रुवारी महिन्यात कंपनीने 100 रुपये अंतरिम डिव्हिडेंड आणि 60 रुपये प्रति शेअर प्रमाणे स्पेशल डिव्हिडेंड जारी केला होता. आता पुन्हा एकदा 110 रुपये डिव्हिडेंड देणार आहे.
कंपनीने या तिमाहीत वर्षापूर्वीच्या तुलनेत (YoY) 18% टक्के वाढीसह 364 कोटी रुपये निव्वळ नफा नोंदवला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या त्याच तिमाहीत कंपनीने 308.5 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता.
दरम्यान, शुक्रवारी (14 फेब्रुवारी) शेअर बाजार बंद होताना कंपनीच्या शेअर्सची किंमत 13,874.95 रुपये होती. मागील 6 महिन्यांत कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत 17 टक्क्यांची घट झाली आहे. तर, 5 वर्षांत गुंतवणूकदारांना 20 टक्के परतावा दिला आहे.
(नोंद – लेखामधील माहिती हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याआधी वित्तीय सल्लागाराशी चर्चा करावी.)