मुंबई – निर्देशांक उच्च पातळीवर असताना जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश येत असल्यामुळे भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांकडून विक्री करून नफा काढून घेणे चालूच आहे. लवकरच अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे पतधोरण जाहीर होणार असल्यामुळे देश-विदेशातील गुंतवणूकदार सावध असल्याचे वातावरण आहे.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 257 अंकांनी कमी होऊन 59,771 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 59 अंकांनी म्हणजे 0.33 टक्क्यांनी कमी होऊन 17,829 अंकांवर बंद झाला.
एचडीएफसी बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, कोटक बॅंक, सन फार्मा, इंडसइंड बॅंक, भारती एअरटेल, कोटक बॅंक इत्यादी कंपन्यांच्या शेअरची विक्री करून गुंतवणूकदारानी नफा काढून घेतला. एल अँड टी, एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट, स्टेट बॅंक, बजाज फायनान्स या कंपन्यांच्या शेअरच्या भावात मात्र खरेदीमुळे वाढ झाली.
अमेरिकेमध्ये महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अमेरिकेची रिझर्व्ह बॅंक असलेले फेडरल रिझर्व्ह पतधोरण कडक करण्याची शक्यता आहे. व्याजदरात वाढ, कर्जरोख्यांची खरेदी थांबविण्यासंदर्भात वेळापत्रक फेडरल रिझर्व्ह जाहीर करेल.
त्यानंतर जगभरातील शेअर बाजार निर्देशांकांना दिशा मिळू शकेल असे जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले. भारतामध्ये आगामी काळामध्ये बरेच दिवस शेअर बाजाराचे कामकाज बंद राहणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदार मोठी पोझिशन घेण्याच्या मनस्थितीत नाहीत.