Stock Market : सेन्सेक्‍स पुन्हा 50 हजारांवर; वाहन, आयटी क्षेत्र तेजीत

मुंबई – गेल्या आठवड्यात वाढीव विकासदराची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर कालपासून शेअर बाजारात खरेदी वाढली आहे. आजही सकाळपासून जोरदार खरेदी होऊन निर्देशांक वाढले. मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेस पुन्हा 50 हजार अंकांच्या वर बंद झाला.

आज सेन्सेक्‍स 447 अंकांनी म्हणजे 0.90 टक्‍क्‍यांनी वाढून 50,296 अंकांवर गेला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 157 अंकांनी वाढून 14,919 अंकांवर बंद झाला.

महिंद्रा, एनटीपीसी, बजाज ऑटो, टेक महिंद्रा, मारुती सुझुकी या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाल्यामुळे मुख्य निर्देशांकांना आधार मिळाला. मात्र या परिस्थितीतही ओएनजीसी, एचडीएफसी, डॉ. रेड्डीज, पॉवर ग्रिड, स्टेट बॅंकेला विक्रीचा मारा सहन करावा लागला.

आज एकूणच बऱ्यापैकी खरेदी झाल्यामुळे सेन्सेक्‍स संबंधातील 30 पैकी 25 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाल्याचे दिसून आले. भारतासह काही विकसित देशांच्या कर्जरोख्या यावरील परतावा वाढल्यामुळे गेल्या आठवड्यामध्ये गुंतवणूकदार अस्वस्थ झाले होते मात्र आता या गाडीवर वातावरण शांत झाल्यामुळे गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे वळू लागले आहेत असे विश्‍लेषकांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.