मुख्य निर्देशांकांची घसरण चालूच
मुंबई – एचडीएफसी बॅंकेने शनिवारी आपला ताळेबंद जाहीर केला होता. त्यानुसार बॅंकेच्या नफ्यात जरी 18 टक्क्यांनी वाढ झाली असली तरी बॅंकेच्या एनपीएमध्ये वाढ होऊन ते 1.40 टक्के झाल्यामुळे एचडीएफसी बॅंकेबरोबरच एचडीएफसी कंपनीचे शेअर 5 टक्क्यांनी कोसळले. याचा मुख्य निर्देशांकावरही परिणाम झाल्याचे दिसून आले.
बॅंकेने जाहीर केलेल्या ताळेबंदानुसार पहिल्या तिमाहीत बॅंकेचा नफा 18 टक्क्यांनी वाढून 5,676 कोटी रुपये झाला आहे.जो की, गेल्या वर्षी या तिमाहीत 4,808 कोटी रुपये इतका होता. या तिमाहीत बॅंकेचे ढोबळ एनपीए 1.33 टक्क्यावरून 1.40 टक्क्यावर गेले आहे. तर निव्वळ एनपीए 0.41 टक्क्यावरून 0.43 टक्क्यावर गेले आहे. आगामी काळात बॅंकेची परिस्थिती आणखी खराब होईल या शंकेमुळे गुंतवणूकदारांनी एचडीएफसी बॅंकेच्या शेअरची विक्री केल्याचे दिसून आले.
एचडीएफसी बॅंकेबरोबर इतर कंपन्यांनी सुमार ताळेबंद जाहीर केले आहेत. जागतिक परिस्थितीही चांगली नसल्यामुळे शेअर बाजार निर्देशांक सोमवारी घसरले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 305 अंकांनी कमी होऊन 38,031 अंकांवर बंद झाला. त्यामुळे निर्देशांक दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेलेले आहेत. सोमवारी विस्तारीत पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 82 अंकांनी कमी होऊन 11,337 अंकांवर बंद झाला.
चार लाख कोटींचे नुकसान
तीन दिवसांत सेन्सेक्स 1184 अंकांनी कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे मूल्य 4 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. सोमवारी वित्त, ग्राहक वस्तू, बॅंकिंग आणि रिऍल्टी क्षेत्रातील कंपन्यांनी सपाटून मार खाल्ला. सरकारच्या नव्या कर धोरणामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी शुक्रवारी 950 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. अर्थसंकल्प जाहीर झाल्यापासून या गुंतवणूकदारांनी 7700 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली आहे.