मुंबई – गेल्या काही दिवसांपासून शेअरबाजारात एकतर्फी विक्री होत होती. अर्थसंकल्पातील नकारात्मक तरतुदी आणि कंपन्यांच्या सुमार ताळेबंदामुळे निर्देशांकांवर परिणाम होत होता. मात्र, गुरुवारी शेअरबाजार निर्देशांक बऱ्यापैकी वाढले.
अमेरिकेत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाल्यामुळे अमेरिकेचे फेडरल रिझर्व्ह व्याजदर कपात करणार नाही अशी चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे भांडवल असुलभता वाढण्याच्या शक्यतेमुळे भारताबरोबरच जागतिक शेअरबाजाराचे निर्देशांक कमी होत होते. मात्र, फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्याजदरात महिन्याच्या शेवटी व्याजदरात कपात होण्याची शक्यता सूचित केल्यामुळे आज शेअरबाजार निर्देशांक वाढले.
गुरुवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 266 अंकांनी म्हणजे 0. 69 टक्क्यांनी वाढून 38,823 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक 84 अंकांनी वाढून 11,582 अंकावर बंद झाला. आज झालेल्या खरेदीचा फायदा इंडसइंड बॅंक, टाटा मोटर्स, वेदांत, स्टेट बॅंक, महिंद्रा, सनफार्मा, टाटा स्टील, एचडीएफसी या कंपन्यांना होऊन या कंपन्यांचे शेअर साडेतीन टक्क्यापर्यंत वाढले. मात्र टेक महिंद्रा, एस बॅंक, टीसीएस ऍक्सिस बॅंकेचे शेअर सव्वा टक्क्यापर्यंत कमी झाले.
अमेरिकेत व्याजदर कपात होणार असल्यामुळे जागतिक भांडवल सुलभता वाढणार असल्यामुळे अमेरिकेसह युरोप आणि आशियाई देशातील शेअरबाजाराचे निर्देशांक वाढले होते. आज रुपयाच्या मूल्यात 14 पैशाची वाढ झाली. तर क्रुडच्या दरात 0.61 टक्क्यांची वाढ होऊन क्रूडचा दर 67.42 डॉलर प्रति पिंपावर गेला. मात्र, आगामी काळात भारतातील कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे ताळेबंद जाहीर होणार आहेत. त्या ताळेबंदाच्या आधारावर निर्देशांक पुढील वाटचाल करतील असे सांगितले जाते.