मुंबई – अमेरिका-चीन व्यापारयुद्धामुळे निर्माण झालेले जागतिक वातावरण सुधारलेले नाही. क्रूड तेलाचे भावही 72 डॉलरच्या पुढे आहेत. मात्र, या परिस्थितीतही भारतीय गुंतवणूकदारांनी निवडक खरेदी केल्यामुळे निर्देशांकांत सुधारणा झाली.
गुरुवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक 278 अंकांनी म्हणजे 0.75 टक्क्यांनी वाढून 37,393 बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 100 अंकांनी वाढून 11,257 अंकांवर बंद झाला. आजच्या तेजीचे नेतृत्व माहिती तंत्रज्ञान, वित्त आणि बॅंकिंग क्षेत्रातील कंपन्यांनी केले. त्याच बरोबर तेल आणि नैसर्गिक वायू, ऊर्जा या क्षेत्राचे निर्देशांक कंपन्यांचे 1.53 टक्क्यांपर्यंत वाढले.
त्याचबरोबर मुंबई शेअरबाजाराचा मिडकॅप आणि स्मॉलकॅप 0.27 टक्क्यांपर्यंत वाढले. जागतिक अनिश्चिततेमुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी बुधवारी 1142 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली तर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 671 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. बजाज फायनान्स कंपनीच्या नफ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने या कंपनीचा शेअर वधारला असल्याचे दिसून आले.
“व्यापारयुद्ध आणि निवडणुकांमुळे गेल्या पंधरवड्यात मोठ्या कंपन्यांच्या शेअरचे भाव बरेच घसरलेले आहेत. त्यामुळे काही गुंतवणूकदारांनी निवडक खरेदी केल्यामुळे शेअरबाजाराचे निर्देशांक वाढले. मात्र, निवडणुकांचे निकाल लागेपर्यंत व अमेरिका चीनचे मतभेद मिटेपर्यंत निर्देशांक अस्थिर राहण्याची शक्यता आहे.
-विनोद नायर, संशोधन प्रमुख, जिओजी वित्तीय सेवा