शेअरबाजार निर्देशांकांना व्यापारयुद्धाचे ग्रहण
मुंबई – अमेरिकेने चीनच्या 200 अब्ज डॉलरच्या वस्तूंवरील आयात शुल्क दुप्पट करण्याची धमकी दिली आहे. आयसीआयसीआय बॅंक आणि भारती एअरटेलने जाहीर केलेल्या ताळेबंदातील नफा कमी झाला आहे. भारतात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका तील अस्थिरता वाढत चालली आहे. या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून शेअरबाजाराचे निर्देशांक एकतर्फी कोसळत आहेत. आज सलग पाचव्या दिवशी भारतीय शेअरबाजाराचे निर्देशांक कमी झाले.
मंगळवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 323 अंकांनी म्हणजे 0.84 टक्क्यांनी कमी होऊन 38,276 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 100 अंकांनी कमी होऊन11,497 अंकांवर बंद झाला.
चीन आणि अमेरिकेदरम्यान सुरू असलेल्या व्यापारयुद्धाचा जागतिक अर्थव्यवस्थेला धोका संभवतो, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटल्यानंतर त्याचा भारतीय शेअरबाजाराबरोबरच जागतिक शेअरबाजारावर परिणाम झाला. आज झालेल्या व्यवहारात टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बॅंक, भारती एअरटेल आणि रिलायन्स कंपन्यांचे शेअर 4.6 टक्क्यांपर्यंत कमी झाले.
मात्र, या परिस्थितीतही एचयूएलएल, एल अँड टी, पावर ग्रीड, इन्फोसिस, ओएनजीसी आणि बजाज ऑटोचे शेअर 1.30 टक्क्यांपर्यंत वाढले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतीय रुपयाचे मूल्य मंगळवारी 69.40 रुपये प्रति डॉलर या पातळीवर स्थिर राहिले. तर क्रुडचे दर 0.70 टक्क्यांनी कमी होऊन 70.71 डॉलर प्रति पिंप या पातळीवर रेंगाळले. अमेरीका आणि चीनच्या मतभेदामुळे जागतीक विकास दर कमी होण्याची शक्यता आहे. तसे झाले तर क्रुडची मागणी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागतिक बाजारात क्रुडचे दर कमी होत असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. निवडणुकामुळे आगामी काळात निर्देशांक अस्थिर राहतील.
आयसीआयसीआय बॅंकेचा स्टॅंडअलोन पातळीवरील नफा कमी झाल्याचा ताळेबंद बॅंकेने काल जाहीर केल्यानंतर मंगळवारी या बॅंकेच्या शेअरचे भाव चार टक्क्यापर्यंत कोसळले. आयसीआयसीआय बॅंक समूहाचा नफा केवळ 2.45 टक्क्यांनी वाढला आहे. बॅंकेला मोठ्या प्रमाणात तरतूद करावी लागली आहे. त्याचा नफ्यावर परिणाम झाला आहे.
“अमेरिकेने चिनी वस्तूवरील आयात शुल्क वाढविण्याची दिलेली धमकी, त्याचबरोबर भारतीय निवडणुकांमुळे वातावरण संदिग्ध असतानाच भारती एअरटेल आणि आयसीआयसीआय बॅंकेचा नकारात्मक ताळेबंद जाहीर झाला आहे. या कारणामुळे भारतीय शेअरबाजारातील वातावरण नकारात्मक राहिले.
-जगन्नाधम धनुगुंतला, उपाध्यक्ष, सॅक्ट्रम ब्रोकिंग