तोटा झाल्यामुळे येस बॅंकेचे शेअर कोसळले

-येस बॅंकेच्या बाजारमूल्यात झाली मोठी घट

-नेस वाडियावरील आरोपामुळे वाडिया समूह पिछाडीवर

मुंबई – येस बॅंकेच्या शेअरचा भाव मंगळवारी तब्बल तीस टक्‍क्‍यांनी कोसळला. चौथ्या तिमाहीत बॅंकेला 1,506 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. खराब कर्जापोटी बॅंकेला मोठी तरतूद करावी लागल्यामुळे येस बॅंकेचा शेअर कोसळला असल्याचे बोलले जाते.

या घटनाक्रमामुळे कंपनीचे बाजारमूल्य 16,048 कोटी रुपयांनी कमी होऊन ते आता 38,909 कोटी रुपये इतके झाले आहे. याबाबत बोलताना सॅम्को सिक्‍युरिटीज या संस्थेचे संशोधन प्रमुख उमेश मेहता यांनी सांगितले की, येस बॅंकेने जारी केलेल्या ताळेबंदबाबत गुंतवणूकदार असमाधानी आहेत. बॅंकेला बराच तोटा झाला असल्यामुळे बॅंक काही काळ नफ्यात येऊ शकणार नाही, असे विक्री करणाऱ्या गुंतवणूकदारांना वाटत होते. गेल्या वर्षी चौथ्या तिमाहीत बॅंकेला 1,179 कोटी रुपयांचा नफा झाला होता. मात्र, या तिमाहीत बॅंकेच्या नफ्यावर मोठा परिणाम झाला आहे. बॅंकेचे एनपीए दुप्पट होऊन 3.22 टक्के झाले आहे. जे की गेल्या वर्षी चौथ्या तिमाहीत केवळ 1.28 टक्के इतके होते.

या घटनाक्रमानंतर मुडीज या विश्‍लेषण करणाऱ्या संस्थेने सांगितले आहे की बॅंक ताळेबंद स्वच्छ करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे बॅंकेला मोठी तरतूद करावी लागली आहे. परिणामी 12 ते 18 महिने बॅंकेच्या ताळेबंदावर परिणाम होऊ शकतो. मात्र, दरम्यान बॅंकेचे कामकाज सुधारू शकते. तिमाही पातळीवर जरी बॅंकेला तोटा झाला असला तरी वार्षिक पातळीवर बॅंकेची कामगिरी तुलनेने चांगली आहे असे मुडीजने आपल्या अहवालात म्हटले आहे.

वाडिया समूहाचे शेअरही कोसळले

वाडिया या समूहातील अनेक कंपन्यांचे संचालक असलेले नेस वाडिया यांना जपानमधील न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली असल्याचे काही वृत्तमाध्यमातून जाहीर झाल्यानंतर वाडिया या समूहातील कंपन्यांचे शेअर दहा टक्‍क्‍यांपर्यंत कोसळले. बॉम्बे डाईंगचा शेअर 9.78 टक्‍क्‍यांनी, ब्रिटानिया इंडस्ट्रीजचा शेअर 2.50 टक्‍क्‍यांनी कोसळला. मुंबई शेअरबाजाराने या वृत्ताबाबत कंपनीकडे स्पष्टीकरण मागितले आहे. मात्र, वाडिया समूहाच्या प्रवक्‍त्याने सांगितले की, या निकालाचा समूहातील कंपनीवर किंवा नेस वाडिया यांच्या कामावर परिणाम होणार नाही.

मुख्य निर्देशांकांत घट

लवकरच होणाऱ्या निवडणुका आणि फेडरल रिझर्व्हचे जाहीर होणारे पतधोरण या कारणामुळे जागतिक शेअरबाजाराबरोबरच भारतीय शेअरबाजारात मंगळवारी बरीच विक्री होऊन निर्देशांक कमी पातळीवर बंद झाले. त्यातच येस बॅंकेचा शेअर कोसळल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळू शकला नाही. मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 35 अंकांनी कमी होऊन 39,031 अंकावर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी सहा अंकांनी कमी होऊन 11,748 अंकांवर बंद झाला. बॅंका आणि वाहन कंपन्यांच्या शेअरनी मंगळवारी सपाटून मार खाल्ला. त्यामुळे निर्देशांकांत घट झाल्याचे विश्‍लेषकांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.