मुंबई – कालपर्यंत वाढत असलेले क्रूडचे दर शुक्रवारी बरेच कमी झाले. त्यामुळे रुपयाच्या मूल्यातही मोठी वाढ झाली. या कारणामुळे कुंपणावर बसून असलेल्या गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यामुळे शुक्रवारी शेअरबाजार निर्देशांक उसळले.
शुक्रवारी क्रूडचे दर 75 डॉलर प्रति पिंप पेक्षा कमी झाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर शुक्रवारी रुपयाच्या मूल्यात ही पंचवीस पैशाची वाढ होऊन रुपयाचा दर 70 रुपये प्रति डॉलर च्या खाली आला होता. त्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार सक्रिय झाले होते. कालही परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 3,785 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. तर काल देशातील संस्था गुंतवणूकदारांनी 4,069 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केले.
शुक्रवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 336 अंकांनी वाढून 39,067 बंद झाला. तर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 112 अंकांनी वाढून 11,754 अंकांवर बंद झाला.
गेल्या चार दिवसांपासून शेअरबाजार निर्देशांक बरेच होते. सरलेल्या आठवड्यात सेन्सेक्स 72 अंकांनी कमी झाला तर निफ्टी एक अंकाने वाढला. टाटा स्टीलने चांगला ताळेबंद जाहीर केल्यामुळे कंपनीच्या शेअरचे भाव शुक्रवारी 6.67 टक्क्यांनी वाढले. त्याचबरोबर याच कारणामुळे ऍक्सिस बॅंकेच्या शेअरचे भाव 2.61 टक्क्यांनी वाढले.
शुक्रवारी तेल आणि नैसर्गिक वायू, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरच्या भावात 1.92 टक्क्यापर्यंत वाढ झाली. तर वाहन ग्राहक वस्तू, दूरसंचार कंपन्यांच्या शेअरच्या भावात 1.06 टक्क्यांपर्यंत घट झाली. शुक्रवारी मुंबई शेअरबाजाराचा मिडकॅप आणि स्मॉलकॅप 0.44 टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचे दिसून आले. जागतिक बाजारात शुक्रवारी क्रूडचे दर 1.18 टक्क्यांनी कमी होऊन 73.41 डॉलर प्रति पिंप या पातळीवर गेले.
“चीनमधील औद्योगिक उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर चीन आणि अमेरिकेचे व्यापारी संबंध सुधारण्याची शक्यता असल्यामुळे जागतिक बाजारात क्रूडचे दर मोठ्या प्रमाणात घसरले. त्यामुळे शुक्रवारी भारतीय शेअरबाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याचे दिसून आले. मात्र, निवडणुका आणि अन्य कारणांमुळे आगामी काळातही निर्देशांक अस्थिर राहण्याची शक्यता आहे.
-दीपक जसानी, संशोधन प्रमुख, एचडीएफसी सिक्युरिटीज