शेअरबाजार निर्देशांकांत वाढ

जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आल्याचा परिणाम

मुंबई -जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आल्यामुळे शुक्रवारी धातू, वित्त, माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरची खरेदी होऊन शेअरबाजार निर्देशांक वाढले. चीन आणि अमेरिकेदरम्यान व्यापारी करार होण्याची शक्‍यता वाढल्यामुळे जागतिक बाजारात तेजीचे वातावरण होते.

शुक्रवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 177 अंकांनी वाढून 38,862 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक 67 अंकांनी वाढून 11,665 वर बंद झाला. सरलेल्या आठवड्यात सेन्सेक्‍स 182 अंकांनी तर निफ्टी 42 अंकांनी वाढला आहे. पुढील चार आठवड्यात अमेरिका आणि चीनदरम्यान व्यापार करार होण्याची शक्‍यता अमेरिकेने सूचित केल्या नंतर अमेरिका, चीन आणि युरोपातील शेअरबाजाराचे निर्देशांक वाढले होते.

याबाबत बोलताना जिओजी वित्तीय सेवा या संस्थेचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसात शेअरबाजारात मरगळ होती. मात्र अमेरिका-चीन संबंध सुधारण्याची शक्‍यता असल्यामुळे शेअरबाजारात शुक्रवारी तेजीचे वातावरण होते. आज मिडकॅप आणि स्मॉलकॅपमधील कंपन्यांच्या शेअरची बरीच खरेदी झाली. त्यामुळे शुक्रवारी मिडकॅप आणि स्मॉलकॅप 0. 72 टक्‍क्‍यांपर्यंत वाढले.

या वर्षात आतापर्यंत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअरबाजारात पाच 5 अब्ज डॉलरची गुंतवणूक केलेली आहे. मात्र, गेल्या आठवड्यापासून हे गुंतवणूकदार विक्री करीत आहेत. गुरुवारी या गुंतवणूकदारांनी 226 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. तर देशातील संस्था गुंतवणूकदारांनी 1206 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.

मात्र दीर्घ पल्ल्यात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भारतीय शेअरबाजारात खरेदी करतील असे वातावरण आहे. आता पुढील आठवड्यात भारतातील कंपन्या आपल्या चौथ्या तिमाहीचे ताळेबंद जाहीर करणार आहेत. त्यामुळे निर्देशांकांना थोडीफार दिशा मिळू शकेल. मात्र निवडणुकांचा हंगामामुळे शेअरबाजार निर्देशांक अस्थिर राहण्याची शक्‍यता आहे. आज रुपयाचे मूल्य सात पैशांनी वाढून रुपयाचा भाव प्रति डॉलरला 69.24 रुपये इतका झाला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.