मारुती सुझुकीचे शेअर कोसळले

तिसऱ्या तिमाहीत नफा 17 टक्‍क्‍यांनी कमी

मुंबई – कार उत्पादक मारुती सुझुकी कंपनीने जाहीर केलेल्या ताळेबंदात नफा 17 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 1489 कोटी रुपये इतका झाला असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आज या कंपनीच्या शेअरचे भाव 7.40 टक्‍क्‍यांनी कमी झाले. त्याबरोबर इतर कार कंपन्यांच्या शेअरच्या भावावरही नकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वाहन, धातू आणि रिऍल्टी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची विक्री वाढल्यामुळे शुक्रवारी भारतीय शेअरबाजाराचे निर्देशांक कमी झाले. बाजारातील नकारात्मक वातावरणामुळे निफ्टीशी संबंधित 50 पैकी 32 कंपन्याचे शेअर घसरले. शुक्रवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 169 अंकांनी म्हणजे 0.47 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 36025 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 69 अंकांनी कमी होऊन 10780 अंकावर बंद झाला.

रुपया घसरत असल्यामुळे आणि जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश येत असल्यामुळे काल परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 94 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. तर काल देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 387 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी करून निर्देशांकांना आधार देण्याचा प्रयत्न केला.

काल आयसीआयसीआय बॅंकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांच्या काही निर्णयाची सीबीआयने चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे कालच्याप्रमाणे आजही या बॅंकेच्या शेअरच्या भावावर दबाव राहिला. त्याबरोबर एशियन पेंटस्‌चे शेअरही आज घसरले. आज मिडकॅप 1.58 टक्‍क्‍यांनी तर स्मॉलकॅप 1.20 टक्‍क्‍यांनी कमी झाले. रिऍल्टी, वाहन, धातू, भांडवली वस्तू या क्षेत्रांना विक्रीचा फटका बसला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)