मुंबई – सरलेल्या आठवड्यातही भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात वाढ झाली. गेल्या तीन आठवड्यापासून शेअर निर्देशाकात वाढ झाली. सरलेल्या आठवड्यात झालेली वाढ सहा महिन्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली. जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश, घसरलेल्या खनिज तेलाच्या किमती आणि रिझर्व बँकेच्या पतधोरणाचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर झाला.
सरलेल्या आठवड्यामध्ये मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 2.38 टक्क्यानी म्हणजे 1,906 अंकांनी वाढून 81,709 अंकावर बंद झाला. या कालावधीत राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 546 अंकांनी म्हणजे 2.26 टक्क्यांनी वाढून 24,677 अंकावर बंद झाला. या आठवड्यात मुंबई शेअर बाजाराचा मिडकॅप साडेतीन टक्क्यांनी वाढला, युको बँक, मॅक्स हेल्थ केअर इन्स्टिट्यूट, कॅस्ट्रोल इंडिया, टाटा अॅलेक्सी या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाल्यामुळे मिडकॅप वाढण्यास मदत झाली. स्मॉल कॅप 3.3 टक्क्यांनी वाढला.
सरलेल्या आठवड्यामध्ये बांधकाम आणि सरकारी बँकांच्या निर्देशांकात पाच टक्के वाढ झाली. धातू आणि माध्यम क्षेत्राचा निर्देशांक चार टक्क्यांनी वाढला तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या निर्देशांकातही चार टक्के वाढ झाली. टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली तर एअरटेल, आयटीसी, एशियन पेंट्स या कंपन्यांचे शेअर पिछाडीवर होते.
सरलल्या आठवड्यांमध्ये परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 11,933 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली तर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 1,792 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. सरलेले आठवड्यात रुपयाची मात्र बरीच हानी झाली. या आठवड्यात रुपयाचा भाव 20 पैशांनी कोसळून 84 रुपये 69 पैसे प्रति डॉलर या पातळीवर बंद झाला. आयातदाराकडून डॉलरची मागणी वाढत असल्यामुळे रुपयाच्या मूल्यात घट होत आहे. मात्र ही घट थांबवणसाठी रिझर्व बँक प्रयत्न करीत आहे.