केवळ 12 महिन्यांत निफ्टी 12,500 अंकांवर जाणार!

भारतीय शेअर बाजाराबाबत विश्लेषक संस्था आशावादी

नवी दिल्ली -गेल्या एक महिन्यापासून भारतीय शेअरबाजार निर्देशांक मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. ही सूज तर नाही ना, अशी शंका व्यक्‍त केली जाऊ लागली आहे. मात्र, भारतीय कंपन्यांची उत्पादकता आणि नफा आगामी काळात वाढणार आहे. त्यासाठी देशांतर्गत आणि परदेशातील परिस्थिती पूरक आहे. त्यामुळे आगामी काळातही निर्देशांक वाढतील, असे जागतिक विश्‍लेषक संस्थांना वाटत आहे. गोल्डमॅन सॅक्‍स या संस्थेने बारा महिन्यांत राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 12,500 अंकांपर्यंत वाढेल असे म्हटले आहे.

संस्थेने म्हटले आहे की, आगामी काळात स्थिर सरकार येण्याची शक्‍यता गुंतवणूकदारांना वाटत आहे. सप्टेंबर महिन्यात भारताची स्थूल आर्थिक व्यवस्था खराब असल्याचे या संस्थेने सांगितले होते. मात्र, दरम्यानच्या काळात निफ्टी आठ टक्‍क्‍यांनी वाढला आहे. त्यामुळे आता या संस्थेने भारतीय शेअरबाजाराबाबत सकारात्मक वक्‍तव्य केले आहे.

या संस्थेच्या संशोधन अहवालात म्हटले आहे की, नोटाबंदी व जीएसटीचा परिणाम समाप्त झाल्यामुळे बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात खरेदी चालू आहे. देशातील आणि परदेशातील भांडवल सुलभतेची परिस्थिती सुधारत असल्यामुळे आगामी काळातही भारतीय शेअरबाजारात जोरदार खरेदी होण्याची शक्‍यता आहे. छोट्या उद्योगांना आणि मोठ्या उद्योगांना पुरेसा कर्जपुरवठा व्हावा याकरिता बॅंका प्रयत्न करणार आहेत.

बॅंकांची कर्जपुरवठा क्षमता वाढण्याची शक्‍यता आहे. पुढील बारा महिन्यांत कंपन्यांची उत्पादकता 16 टक्‍क्‍यांनी वाढेल व निफ्टी 12,500 अंकापर्यंत जाण्याची शक्‍यता आहे. सध्या मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 38,386 आणि निफ्टी 11,521 अंकावर आहे. पुढील दोन महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. सध्याचे वातावरण राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी पूरक आहे. नवे सरकार स्थिर असेल असे गुंतवणूकदारांना वाटते.

या तेजीचे विश्‍लेषण करताना एम्के मालमत्ता व्यवस्थापन संस्थेचे संशोधन प्रमुख जोसेफ थॉमस यांनी सांगितले की, देशात आणि परदेशात भांडवल सुलभता आहे, रुपया स्थिर झाला आहे, त्याचबरोबर कमी-अधिक प्रमाणात जागतिक शेअरबाजाराचे निर्देशांक वाढत आहेत. या कारणामुळे भारतीय शेअरबाजाराचे निर्देशांक आगेकूच करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.