‘सर्वधारा’च्या मुक्तिबोध जन्मशताब्दी विशेषांकाचे प्रकाशन

प्रा. डहाके यांच्या 'कॅक्टस' निवासस्थानी प्रकाशन सोहळा

अमरावती – मराठीतील महत्त्वाचे साहित्यिक शरदचंद्र मुक्तीबोध यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने प्रसिद्ध करण्यात आलेला “सर्वधारा’ या नियतकालिकाचा ताजा अंक एखाद्या पुस्तकासारखा संग्राह्य आहे. यामधून मुक्तीबोधांचे समग्र दर्शन घडवण्यात आले आहे. पंधरा वर्षे पदरमोड करून व्रतस्थपणे नियमित सुरू असलेले ‘सर्वधारा’ हे मराठी भाषेतील एक महत्त्वाचे नियतकालिक असून शरच्चंद्र मुक्तिबोध जन्मशताब्दीनिमित्त संग्राह्य असा विशेषांक या नियतकालिकाने प्रकाशित केला आहे. मराठीतील महत्त्वाचे अनेक लेखक ‘सर्वधारा’ तून लिहीत असतात.या नियतकालिकाचे योगदान फार मोलाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी व समीक्षक प्रा. वसंत आबाजी डहाके यांनी केले.

सर्व साहित्य व कला प्रकारांना वाहिलेल्या “सर्वधारा’ या नियतकालिकाच्या शरच्चंद्र मुक्तिबोध जन्मशताब्दी विशेषांकाचे प्रकाशन १३ एप्रिल रोजी ज्येष्ठ साहित्यिक प्रा.वसंत आबाजी डहाके यांचे हस्ते झाले. यावेळी संस्थापक संपादक डॉ.सुखदेव ढाणके, ज्येष्ठ कवयित्री प्रभा गणोरकर यांचेसह ‘सर्वधारा’ संपादक मंडळ, डॉ. अजय देशपांडे हे कार्यकारी संपादक, सदस्य प्राचार्य डॉ गणेश टाले, डॉ.अण्णा वैद्य, हे उपस्थित होते. प्रा. डहाके यांच्या ‘कॅक्टस’ निवासस्थानी हा प्रकाशन सोहळा अगदी साधेपणाने झाला. डॉ देवानंद सोनटक्के, डॉ. गणेश टाले, डॉ.अण्णा वैद्य , डॉ.गजानन बनसोड, डॉ.भूषण रामटेके हे संपादक मंडळ सदस्य आहेत.

सर्वधारा’च्या या विशेषांकात समीक्षक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, डॉ. हेमंत खडके, डॉ. सतीश बडवे, डॉ.पुरुषोत्तम माळोदे, डॉ. श्याम माधव धोंड, डॉ.राजेन्द्र नाईकवाडे, डाॅ.अजय देशपांडे, डॉ.तातोबा बदामे, डॉ.भूषण रामटेके यांचे शरच्चंद्र मुक्तिबोध यांच्या कविता, कादंबरी,समीक्षाविचार आदी समग्र साहित्याची चिकित्सा करणारे लेखन आहे. याशिवाय म.म.देशपांडे, विंदा करंदीकर, त्र्यं.वि.सरदेशमुख, भालचंद्र नेमाडे आणि शरच्चंद्र मुक्तिबोध यांची काही दुर्मिळ पत्रे आहेत. प्रा.वसंत आबाजी डहाके यांची आशयघन रेखाटने असणाऱ्या या विशेषांकाचे मुखपृष्ठ चित्रकार संतुक गोलेगावकर यांनी केले आहे.

यापूर्वीही ‘ सर्वधारा ‘ ने दशकपूर्ती वर्षानिमित्त नव्वदोत्तर कविता, कथा, कादंबरी, नाटक, आत्मकथन हे पाच संग्राह्य विशेषांक प्रकाशित केले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.