शरद पवारांचा आशीर्वाद घेऊन उदयनराजे रविवारी भाजपमध्ये

सातारा : छत्रपती उदयनराजे भोसले यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेले काही दिवस सुरू असणाऱ्या संभ्रमाच्या वातावरणावर पडदा पडला आहे. सकाळी राजे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते पक्षांतर करणार नाहीत, अशी अटकळ व्यक्त होत होती. मात्र ती फोल ठरवत राजे यांनी भाजपात जाण्याच्या निर्णयावर सायंकाळी शिक्कामोर्तब केले.

ऱाष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी उदयनराजेंनी आज चर्चा केली. त्यानंतर पाच तासांत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानुसार उदयनराजें शनिवारी दि. 14 रोजी दिल्लीस जाऊन खासदारकीचा राजीनामा देतील. रविवारी दि.15 रोजी महाजनादेश यात्रेत समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करतील. गेल्या महिनाभरापासून त्यांच्या प्रवेशाची चर्चा होती. त्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. रविवारी साताऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत उदयनराजे दिसतील, असा हवाला जलमंदिरच्या संपर्क सूत्रांनी दिला .

दरम्यान, सकाळी महसूल मंत्री आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले होते की उदयनराजे यांनी आणखी कार्यकर्त्यांशी बोलायचे आहे, असे सांगून त्यांनी वेळ मागितला आहे. त्यामुळे त्यांचा भाजपा प्रवेश खोळंबला आहे. मात्र, मुख्यमंत्री त्यांच्या संपर्कात आहेत. त्यांचा भाजपातील प्रवेश नक्की आहे.

शरद पवार यांनी पुण्यात उदयन राजे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार शशिकांत शिंदे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे होते. साहेब मी तुमचा आशिर्वाद घ्यायला आलोय , माझ्या मनात तुमच्या विषयी आदरच आहे मात्र साताऱ्याच्या विकासासाठी मी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला, असा थेट बाऊन्सर उदयनराजे यांनी पवारांसमोर टाकल्याचे सुत्रांनी सांगितले. तत्पुर्वी, खा. अमोल कोल्हे आणि स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी त्यांची भेट घेऊन भाजपात जाऊ नये म्हणून गळ घातली होती.

भारतीय जनता पक्षातील प्रवेशाबाबत पुण्यात राजेंनी कार्यकत्याची बैठक घेतली होती. त्यात काही कार्यकर्त्यांनी भाजपात गेल्यास मान राहणार नाही. तसेच राजीनामा देऊन निवडणूक लढविणे सध्या गैरसोयीचे असल्याची भूमिका मांडली होती. या सगळ्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)