मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी रंगलेल्या शाब्दिक चकमकीदरम्यान अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. कंगनाच्या या वक्तव्यावरून तिच्याविरोधात राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र कंगनाने तलवार म्यान केली नसल्याने हा वाद चिघळताना दिसतोय.
अशातच आज बीएमसीतर्फे कंगनाच्या कार्यालयावर कारवाई करण्यात आली आहे. शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा अधिकाऱ्यांनी कंगनाची कार्यालयाचा काही भाग अतिक्रमण असल्याचे सांगत पाडला. महापालिकेच्या या कारवाईबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोध दर्शवला असून सेनेलाही सुनावले आहे.
कंगनाची कार्यालयावर झालेल्या कारवाईला विरोध दर्शविताना पवार यांनी, ‘कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई करत तिला बोलण्यासाठी अनावश्यक संधी दिली आहे. मुंबईमध्ये कित्येक अनधिकृत बांधकामे आहेत. आता अधिकाऱ्यांनी हा निर्णय का घेतला हे पहावे लागेल.’ अशी भूमिका मांडली.
तसेच या कारवाईबाबत शिवसेनेला सुनावताना, ‘प्रत्येकाला माहिती आहे की, मुंबई पोलीस सुरक्षेसाठी काम करते. यामुळे कंगना सारख्या लोकांना प्रसिद्धी देता नये’ असं वक्तव्य केलं.
दरम्यान, शिवसेनेची सत्ता असलेल्या बीएमसीतर्फे कंगनाची कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाईचा भाजपतर्फे विरोध करण्यात आला असून आता राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षांनीही कारवाईचे समर्थन केले नसल्याने राष्ट्रवादीही या प्रकरणावरून शिवसेनेसोबत नसल्याचं दिसतंय.