शरद पवारांचे मोदींबातचे ‘ते’ भाकीत फोल

पुणे – भारतीय राजकारणातील चाणक्‍य म्हणून ज्यांचे वर्णन केले जाते त्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी, “नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तरी त्यांच्या सरकारची अवस्था 1996च्या अटलबिहारी वाजपेयी सरकारसारखी होईल आणि हे सरकार अवघे 13 किंवा 15 दिवस टिकेल.” असे भाकीत शरद पवार यांनी केले होते. पवार यांच्या या भाकिताची भाजपतर्फे त्यावेळी खिल्ली देखील उडवली जात होती. मात्र तरीदेखील गेल्या निवडणुकीतील मोदी लाटेमुळे अनेक राज्यांत भाजपला मिळालेले जबरदस्त यश यावेळी टिकणे शक्‍य आहे का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात होता.

गेल्या 5 वर्षांच्या काळात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांत सत्ता गमवावी लागली होती तर कर्नाटक आणि गुजरातमधील प्रभावही कमी झाला असल्याचं जाणवत होतं. उत्तर प्रदेशात गेल्या वेळी भाजपला मोठे यश मिळाले असले तरी यावेळी सपा आणि बसपा यांच्या आघाडीमुळे भाजपला फटका बसेल असं देखील बोललं जात होतं. मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये देखील आज लागलेल्या निकालांमुळे विरोधकांच्या तोंडच पाणी पाळलं असून गेल्यावेळीच्या 281 जागांमध्ये घट होण्याची शक्यता असतानाही भाजपच्या जागा वाढतानाच दिसत आहेत. सध्या भाजप २९४ जागांवर आघाडीवर असून त्यांच्या ६ जागा निवडून आल्या असल्याने भाजपला ३०० जागा मिळण्याची शक्यता आहे.

एकंदरीतच आजच्या निकालांची आकडेवारी पाहता शरद पवारांचे “नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तरी त्यांच्या सरकारची अवस्था 1996च्या अटलबिहारी वाजपेयी सरकारसारखी होईल आणि हे सरकार अवघे 13 किंवा 15 दिवस टिकेल.” हे भाकित पूर्णपणे फोल ठरणार असल्याचं दिसत आहे.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.