शरद पवारांचे राजकारण त्यांच्यावरच उलटत आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पवारांवर टीका

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल आता वाजले आहे. त्यातच आता राज्यात आदर्श आचारसंहितादेखील लागू झाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. आजपर्यंत शरद पवारांनी राज्यात जे राजकारण केले आहे तेच राजकारण आता त्यांच्यावर उलटले आहे असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. मात्र हे करत असताना त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. शरद पवारांच्या राजकारणाचे युग समाप्त झाले आहे. पिढी बदलली आहे. लोकांना तोडण्या-फोडण्याचे राजकारण आता आवडत नाही. नवी पिढी आमच्यासोबत का आहे? कारण त्यांना अभिप्रेत असलेली राजकीय भूमिका भाजपाकडून घेतली जाते म्हणून ते भाजपासोबत आहेत असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच शरद पवारांनी जे राजकारण केले तेच आता राष्ट्रवादीसोबत होत आहे असे फडणवीस म्हणाले. तुम्ही साखर सम्राटांना भाजपामध्ये येण्यासाठी नोटीसचे भय दाखवता असा आरोप शरद पवार करतात. त्यावर फडणवीस यांनी शरद पवार असे राजकारण करायचे. त्यामुळे त्यांना तसे वाटते. शरद पवारांनी राजकारण करताना पक्ष बनवले, फोडले आता तेच त्यांच्यासोबत होत आहे तर ओरड कशाला करता? वर्षात भ्रष्टाचाराचा आरोप नसलेले हे महाराष्ट्रातील पहिले सरकार आहे असे दावा फडणवीस यांनी केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.