पक्ष सोडणाऱ्यांना थारा देऊ नका

शरद पवार यांची टीका : दत्तात्रय भरणे यांच्या प्रचाराची इंदापुरात सांगता

रेडा – कर्मयोगी शंकरराव पाटील यांनी कधीही कॉंग्रेस पक्षाचा विचार सोडला नाही. राजेंद्र घोलप हे कॉंग्रेसच्या विचाराचे होते. इंदापूर तालुका हा नेहरू-गांधी यांच्या विचाराला मानणारा आहे; परंतु, जे चुकीच्या रस्त्याने तालुक्‍यातील नेते गेले आहेत, अशा पक्ष सोडणाऱ्या नेत्यांना तालुक्‍यातील जनता थारा देणार नाही, हे मतदारांनी दाखवून द्यावे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.

इंदापूर विधानसभा मतदारसंघातील महाअघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचाराची सांगता सभा इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात झाली, त्यावेळी पवार बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रवीण माने, जि.प.सदस्य अभिजीत तांबिले, सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने, रत्नाकर मखरे, विठ्ठल ननवरे, महारुद्र पाटील, स्वप्नील सावंत, संजय सोनवणे, छाया पडसळकर, दशरथ डोंगरे, उत्तम फडतरे, रणजीत निंबाळकर, सचिन सपकळ, शुभम निंबाळकर, डॉ. शशिकांत तरंगे, श्रीधर बाब्रस, दत्तात्रेय मोरे, दत्तात्रेय बाबर, बबनराव खराडे यांच्यासह कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मित्र पक्षाचे कार्यकर्ते व हजारो मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आमदार भरणेंनी कोटीत विकासकामे केली आहेत. तब्बल तेराशे कोटींचा निधी तालुक्‍याच्या विकासासाठी आणला आहे. त्यामुळे भरणे निवडून येणार आहेत. मला लोकसभेला 70 हजारांची आघाडी तालुक्‍यातील जनतेने दिली आहे; आता भरणे यांना मताधिक्‍य द्या.

इंदापूर तालुक्‍यातील जनतेला पाणी मिळण्यासाठी आम्ही माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांच्या नावाने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. याचिकेचा निकाल तालुक्‍याच्या शेतकऱ्यांच्या हिताचा लागणार असल्याने, जवळपास सहा टीएमसी पाणी तालुक्‍याला जास्तीचे मिळणार आहे. आगामी काळात फक्‍त शेतीच्या पाण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी मी काम करणार आहे, त्यामुळे नागरिकांनी चिंता करू नये.
– दत्तात्रय भरण, आमदार

Leave A Reply

Your email address will not be published.