सोनियांच्या भेटीनंतरही शरद पवारांचा सरकारबाबत गुगलीच!

शिवसेनेने पाठींबा मागितला नाही पण भविष्याबाबत बोलू शकत नाही
नवी दिल्ली : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाची आहे, असे बजावत शिवसेने आमच्याकडे पाठींबा मागितला नाही. मात्र, भविष्यात काय होईल, याबाबत मी आत्ताच काही सांगू शकत नाही, असे सांगून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा अनुत्तरीतच ठेवला.

कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या भेटीत गांधी यांना महाराष्ट्रातील राजकीय स्थितीची माहिती पवार यांनी दिली. भाजप आणि सेनेत सत्तेतील समान वाटा आणि मुख्यमंत्री पदाचे वाटप या मुद्यावरून निर्माण झालेल्या संघर्षाची कल्पना दिली. त्यावर घ्यायच्या भूमिकांबाबत दोन्ही नेत्यांत चर्चा झाली. भारतीय जनता पक्षाची साथ सोडून शिवसेना बाहेर पडली तर त्यांना पाठींबा देण्याच्या शक्‍यतेवरही चर्चा झाली असल्याचे समजते.

महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला विरोधकांत बसण्याचा जनादेश दिला आहे. मात्र भविष्याबाबत तुम्ही बोलू शकत नाही, असे सूचक विधान त्यांनी केले. ते म्हणाले, राज्यात सरकार स्थापण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाची आहे. त्यांच्याकडे सहकारी पक्षासोबत आवश्‍यक बहुमत आहे. शिवसेने पक्षप्रमुख उध्दव ठाकरे अथवा त्यांच्या कोणीही नेत्यांनी राष्ट्रवादीकडे पाठींबा मागितला नाही,असे पवार म्हणाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जाण्याच्या वृत्तात कोणतेही तथ्य नसल्याचे सांगत त्यांनी त्याबाबत ठाम नकार व्यक्त केला.

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेतील सत्ता वाटपाच्या मुद्यावरून निर्माण झालेला संघर्ष तीव्र बनला असून त्याने गंभीर रुप धारण केले असल्याचे पवार म्हणाले.
भाजपा आणि सेनेला 161 जागा मिळाल्या आहेत त्यामुळे ते सहज सरकार बनवू शकतात. मात्र मुख्यमंत्री पदावरील हक्कातून दोन्ही पक्षात तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. भाजपाकडे 105, शिवसेनेकडे 56, राष्ट्रवादीकडे 54 तर कॉंग्रेसकडे 44 आमदार आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तास्थापनेकडे देशाचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.