मुंबई : राज्यात सध्या शिवसेना पक्षनाव आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगासमोर सुरु आहे. तर दुसरीकडे शिवसेना ( ठाकरे गट ) आणि वंचित बहुजन आघाडीत युती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तसेच, आज याबाबत घोषणा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या युतीबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोजक्या शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबद्दल बोलताना शरद पवार, “मला याबाबत काही माहिती नाही. मी या भानगडीत पडत नाही,” असे उत्तर शरद पवार यांनी दिलं आहे.
दरम्यान, “उद्धव ठाकरेंबरोबर बोलणी सुरु आहे. अधिकृत घोषणा मी किंवा पक्षाच्या अध्यक्षा रेखाताई ठाकूर करतील. उद्धव ठाकरेंचं ठरलं की घोषणा होईल. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला बरोबर घ्यावं असे शिवसेनेला वाटत आहे. दोन्ही पक्षांचं स्वागतचं करु. माझा दोन्ही पक्षांना विरोध नाही आहे,” असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
“काँग्रेस-राष्ट्रवादीने आम्हाला नाकारलं आहे. वंचित आघाडीने फक्त दलितांपुरतं मर्यादित राहावं. ओबीसी आणि गरीब मराठा यांच्यासंदर्भात आम्ही बोलू नये, ही काँग्रेस-राष्ट्रवादीची अट आहे. ती आम्ही मान्य करण्यास तयार नाही आहोत. तसेच, आम्हाला तिसरं इंजिन जोडणार आहे, असं एकनाथ शिंदे मुंबईतील भाषणात बोलले होते. हे तिसरं इंजिन राष्ट्रवादी आहे, की मनसे याचा खुलासा एकनाथ शिंदे करतील,” असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.