नव्या संसदेचे उद्घाटन : धर्मविधींवर शरद पवारांची नाराजी; म्हणाले…

मुंबई – “संसदेत धर्मकांड सुरू होते. त्यामुळे आधुनिक भारताची नेहरूंची संकल्पना मागे पडली की काय? याची चिंता वाटत आहे. आपला देश अनेक वर्ष पाठीमागे जात असल्याची चिंताही वाटत आहे,’ असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज साधू-संतांच्या हस्ते आणि मंत्रोच्चारात संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन केली. यावेळी सर्व धर्मियांची प्रार्थना सभाही झाली. त्यावर आक्षेप घेताना पत्रकार परिषदेत पवारांनी हा मुद्दा मांडला आहे.
शरद पवार पुढे म्हणाले, आज नव्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्यात काही धर्मकांड सुरू होती, ते पाहिल्यानंतर जवाहरलाल नेहरू यांनी आधुनिक भारताची जी संकल्पना मांडली होती ती मागे पडते काय, अशी चिंता वाटते. विज्ञानाशी तडजोड करता येत नाही. पंडित जवाहरलाल नेहरूंनी आधुनिक विज्ञानावर आधारीत समाज तयार करण्याची भूमिका मांडली. मात्र, आज नव्या संसदेत नेमके उलटे चालले आहे.
तसेच, नव्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण माझ्यापर्यंत आले नाही, अशा शब्दांत पवारांनी नाराजीही व्यक्त केली. तसेच, नव्या संसदेची उभारणी करताना आमच्याशी साधी चर्चाही केली नाही. सर्वांना या कामात सहभागी करून घेतले असते, तर अधिक चांगले झाले असते, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
आस्था जुन्या संसदेशीच
पवार पुढे बोलताना म्हणाले, मी अनेक वर्षांपासून जुन्या संसदेत काम केले आहे. त्यामुळे माझी आस्था, बांधिलकी ही जुन्या संसदेशी आहे. दिल्लीत कोणीही नवीन माणूस गेला की तो संसद, राष्ट्रपती भवन आणि इंडिया गट या स्थळांना भेटी देतोच. या वास्तूंमधन देशाचा इतिहास मांडला गेला आहे. मात्र, आता त्यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होत आहे का?, अशी शंका येते.





