मुंबई – पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील आमदार भारत भालके यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या जागेसाठी अनेक नेत्यांकडून फिल्डींग लावण्यात आली होती. एवढच काय अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार या जागेवरून निवडणूक लढविणार अशी चर्चा सुरू होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पंढरपूरमधून उमेवारी निश्चित केली आहे.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून १७ एप्रिलला मतदान होणार आहे. तर २ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी २३ मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली असून ३० मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर ३ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.
आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मान्यतेने पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत श्री. भगीरथ भारत भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार घोषित करण्यात येत आहेत. ते नक्की विजय होतील, असा आम्हाला विश्वास आहे. भगीरथ भालके यांना शुभेच्छा ! @NCPspeaks
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) March 29, 2021
पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस असताना काही वेळापूर्वीच भाजपकडून समाधान महादेव आवताडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीने देखील उमेदवारी निश्चित केली असून राष्ट्रवादीकडून दिवंगत भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे.
या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून घोषणा केली आहे. जयंत पाटील म्हणाले की, आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मान्यतेने पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भगीरथ भारत भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार घोषित करण्यात येत आहेत. ते नक्की विजयी होतील, असा आम्हाला विश्वास आहे. भगीरथ भालके यांना शुभेच्छा. या घोषणेनंतर शरद पवारांनी भारतनानांच्या मुलाला आमदार करण्याचे निश्चित केलं असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे.