मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए)अध्यक्षपद सोपवण्यावरुन राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगताना दिसत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीचा विचार करता शरद पवार यांच्याकडे युपीएचे नेतृत्व सोपवावे अशी भूमिका मांडली आहे. दरम्यान शऱद पवार यांनी युपीए अध्यक्षपदावरुन महत्वाचे विधान केले आहे.
दिल्ली सीमेवर मागच्या महिनाभरापासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आज दिल्लीला जाणार आहेत. यावेळी ते विरोधी नेत्यांची भेट घेणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना, युपीए अध्यक्षपदासंबंधी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवार यांनी युपीए अध्यक्षपदी विराजनमान होण्याचे वृत्त पूर्णपणे फेटाळून लावले आहे.
“माझ्याकडे युपीए अध्यक्ष होण्यासाठी वेळ किंवा तसा विचार नाही. अशा प्रकारच्या कोणत्याही प्रस्तावाचा प्रश्नच येत नाही,” असेदेखील शरद पवार यांनी सांगितले आहे.
शरद पवार यांनी या अगोदरदेखील युपीए अध्यक्ष होण्याचे वृत्त फेटाळले होते. प्रसारमाध्यमांशी बोलताना शऱद पवार यांनी काही तथ्य नसल्याचे म्हटले होते. “ही बातमी तुम्ही दिली आहे, अशा खोट्या बातम्या देऊ नका,” असे शरद पवार यांनी प्रसारमाध्यांना उद्देशून म्हटले होते.