पुणे : महाराष्ट्र विधानसभेच्या तोंडावर अनेक जण पक्ष सोडून जाताना दिसत आहेत. या पक्षातून त्या पक्षात उडी मारताना दिसत आहेत. यादरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. सोनाई उद्योग समुहाचे संचालक आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रविण माने हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. यामुळे अजित पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
प्रवीण माने यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता. मात्र आता ते राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. आगामी विधानसा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अजित पवार आणि त्यांच्या पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा ज्या नेत्यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला होता, त्यातील काही नेते हे शरद पवार गटात येताना दिसत आहेत. यामुळे निवडणुकीमध्ये शरद पवार गटाची ताकत वाढण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणुकीमध्ये यावेळी तरुण चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर इंदापुरात शरद पवार गटाकडून तरुण चेहरा म्हणून प्रवीण माने यांच्या नावाची चर्चा आहे. यामुळे हा पक्षप्रवेश महत्वाचा मानला जात आहे.