मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आता विधानसभा निवडणुकीतील हाराकिरी मागे टाकून पुन्हा एकदा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरणार आहेत. त्यांनी येत्या 28 तारखेला पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत शरद पवार स्वतः या नेत्यांशी संवाद साधणार असून, पुढील रणनीती आखणार आहेत.
महाविकास आघाडीला गतवर्षीच्या लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले. पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खावा लागला. त्यानंतर प्रकृती बिघडल्यामुळे शरद पवार काहीसे सक्रिय राजकारणातून बाजूला झाले होते. पण आता ते नव्या दमाने पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरलेत.
त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या पक्षाचे आमदार, खासदार व प्रमुख नेत्यांची बैठक मुंबईमध्ये बोलवली आहे. ही बैठक येत्या 28 फेब्रुवारीला वाय बी चव्हाण सेंटरला होणार आहे. या बैठकीद्वारे शरद पवार आपल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून राज्यातील राजकारण व पक्षांतील अंतर्गत परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
पराभवानंतर शरद पवार यांच्या उपस्थितीत ही पहिलीच मोठी बैठक आहे. त्यामुळे या बैठकीत आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून सामोरे जायचे की एकला चलोरेची भूमिका घ्यायची याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. परिणामी, शरद पवार गटाची ही बैठक महाविकास आघाडीचे भवितव्य ठरवणारी असल्याचेही मानले जात आहे.
संघटनात्मक फेरबदलांना जोर
उल्लेखनीय बाब म्हणजे सध्या शरद पवार गटात संघटनात्मक फेरबदलांची मागणीने चांगलाच जोर धरला आहे. याविषयी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची उचलबांगडी केली जाण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः पक्षाचे अनेक नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याच्या मार्गावर असल्याचाही दावा केला जात आहे. यात जयंत पाटील यांच्या कथित पक्षांतराचीही चर्चा रंगली आहे. यामुळेही शरद पवार गटाची प्रस्तावित बैठक महत्त्वाची मानली जात आहे.