विधिमंडळाबाहेर आल्यानंतर ‘भाऊ’ पाठीवर थाप मारायचे- शरद पवार 

कराड: स्व. डॉ. यशवंतराव मोहिते जन्मशताब्दी कार्यगौरव समारंभानिमित्त आज कराड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष्य शरद पवार उपस्थित होते. दरम्यान, स्वातंत्र्यानंतर ज्यांनी देशाच्या विकासासाठी खस्ता खाल्ल्या, सार्वजनिक जीवनात आदर्श घेण्यासारख्या, अनेकांच्या अंतःकरणात आदरस्थानी असलेल्या, महाराष्ट्राच्या सुपुत्राचा आज जन्मशताब्दी सोहळा आहे, अश्या भावना शरद पवार यांनी व्यक्त केल्या.

शरद पवार म्हणाले, समाजातील शेवटच्या माणसालाही सन्मान मिळावा हे सूत्र धरून, सामाजिक प्रश्नांची सोडवणूक होत नाही म्हणून एक वर्ग काँग्रेसमधून बाजूला झाला. त्यात शेती आणि शेतकऱ्यांबद्दल आस्था असणारी नेतृत्वाची फळी बाहेर पडली. त्यातून शेकाप व इतर पक्षांची स्थापना केली. त्यात यशवंतराव मोहिते म्हणजे भाऊंचं नाव अग्रस्थानी घ्यावं लागेल.

एक काळ असाही होता की आमचा व भाऊंचा राजकीय संघर्ष झाला. विरोधक म्हणून तेव्हा समोर भाऊ व माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या तोफा विधिमंडळात धडाडायच्या. सत्ताधाऱ्यांच्या वतीने उत्तर द्यायची जबाबदारी माझ्यावर असायची. पण सभागृहात संघर्ष झाला तरी विधिमंडळाबाहेर आल्यानंतर मात्र चांगले उत्तर दिलेस गड्या म्हणून भाऊ पाठीवर थाप मारायचे. असे व्यक्तिमत्व क्वचितच बघायला मिळते. नंतरच्या काळात स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या आग्रहास्तव पंडित नेहरूंच्या उपस्थितीमध्ये भाऊ काँग्रेसमध्ये आले व त्यानंतर ते काँग्रेसमध्येच राहिले. त्यांचे कर्तृत्व महाराष्ट्राच्या इतिहासात नोंदले गेले असल्याचे पवार म्हणाले.

सभागृहात कोणताही विषय त्यांना दिला तर कोणत्या प्रकारची नीती महाराष्ट्राच्या हितासाठी स्वीकारली पाहिजे याचा संपूर्ण अभ्यास करून ते विषय मांडत. महाराष्ट्र विधिमंडळाच्या कामकाजात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. कृषी-औद्योगिक रचनेचा अभ्यास करण्याची जबाबदारी चव्हाण साहेबांनी भाऊंना दिली. त्यानंतर कारखानदारी, गृहनिर्माण खाते त्यांच्याकडे होते. दुपारी ३ ते पहाटे ३ पर्यंत तब्बल १२ तास भाषण करत गृहनिर्माणाची भावी दिशा काय असावी, यावर भाऊंनी केलेले भाषण राजकीय नेत्यांसाठी आदर्श उदाहरण ठरेल, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)