स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबियांचे शरद पवारांकडून सांत्वन

सोलापूर – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. याभेटीनंतर त्यांनी गणपतराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अपर्ण केली.

शरद पवार हे आज सांगोला दौऱ्यावर होते. शरद पवार म्हणाले, लोकांसाठी झटणारा माणूस हरपला. लोकांच्या प्रश्नांबद्दल अतिशय चिंता आणि त्यातला त्या राज्यातील दुष्काळी भाग व शेतीचा पाण्याचा प्रश्न जिथे भेडसावतोय, त्यासाठी अखंड चिंता आणि चिंतन या दोन्ही गोष्टी गणपतपरावांचे वैशिष्ट होते. ग्रामीण भागातील जीवन सुखकर व्हावे यासाठी ते कायम आग्रही होते. त्यांच्या इतका स्वच्छ, चारित्र्यसंपन्न असा नेता असणे हे महाराष्ट्राचे भाग्य आहे.

कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर व उपेक्षितांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आणि क्‍लेशदायक आहे. महाराष्ट्राच्या चार पिढ्यांच्या मतदारांशी घट्ट नाळ जुळलेला गणपतरावांसारखा लोकप्रतिनिधी खरंच विरळा म्हणावा लागेल.

लोकाभिमुख राजकारणाची कास धरत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून 11 वेळा निवडून येण्याची किमया गणपतरावांनी साधली. त्यांच्या निधनामुळे जनसामान्यांचे आणि कार्यकर्त्यांचे निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा, ध्येयवादी नेता आज आपण गमावला आहे, असे शरद पवार म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.