दबावतंत्राच्या राजकारणाला संपवायचे आहे- शरद पवार

इस्लामपूर: वाळवा, इस्लामपूर मतदारसंघातून जयंत पाटील यांनी आज अर्ज भरला. दरम्यान, आयोजित सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली. सरकार दबावतंत्राचा उपयोग करत आहे. मी कोणत्याही बँकेच्या संचालक नसताना माझ्यावर गुन्हा दाखल केला गेला. ईडीच्या माध्यमातून भीती दाखवली जात आहे. आम्ही कशाला भीत नाही. पण हे दबावतंत्र आहे. या दबावतंत्राच्या राजकारणाला आपल्याला संपवायचे असल्याचे पवार म्हणाले.

आज लोकप्रतिनिधींवर दडपण आणले जात आहे. त्यामुळे अशा लोकांच्या हातातली सत्ता काढून माणुसकीने सत्ता कशी चालवायची हे दाखवून देऊया.  गेल्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती दिली नाही. सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे की खटला चालवा. गुन्हा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा,हे निर्देश सुप्रीम कोर्टाला द्यावे लागतात आणि आम्ही गुन्हेगार नसताना ईडीत आमचे नाव येते, ही दडपशाही नाही का? असा प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला.

इस्लामपूर मधून आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला सुरवात झाली. यावेळी शरद पवार यांनी भाजपवर शेतकरी आत्महत्या, बोरोजगारी, देशावर असलेल्या आर्थिक संकटावरून भाजपवर निशाणा साधला.

शरद पवार म्हणाले, शेतीमालाच्या किमतींविषयी आस्था नाही म्हणूनच मोदी सरकारने कांदा निर्यात करणे थांबवले. असा निर्णय घेऊन सरकार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करत आहे. हे सरकार शेतकरी विरोधी आहे म्हणूनच हा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना फायदा होतो, हे सरकारला बघवत नाही. राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यवतमाळपासून मराठवाड्यापर्यंत एक असं गाव नाही जिथे शेतकरी आत्महत्या झालेली नाही.

या देशातील बड्या लोकांनी पैसे थकवले. त्यामुळे असंख्य बँका अडचणीत आल्या आहेत. केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेतून त्यांचे ८६ हजार कोटी भरले. आमच्या शेतकऱ्यांनी पैसे थकवले तर जप्ती आणली जाते. हा अन्याय का? असा प्रश्न देखील शरद पवारांनी उपस्थित केला.

“महिला अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. अत्याचारात सामील झालेल्यांना संरक्षण दिले जाते. लोकसभेत भाजपाचे स्वामी चिन्मयानंद आहेत. त्यांनी एका मुलीवर अत्याचार केले. अशा लोकांच्या हातात कशासाठी सत्ता देता? स्त्रीचा अवमान करणाऱ्यांना आपण उभे करायचे नाही. महागाई वाढली आहे, आर्थिक संकट आले आहे, महिला सुरक्षित नाहीत, मग हे मतं कशाच्या जीवावर मागायला येतात? असा प्रश्न उपस्थित करत हे भावनेच्या आधारावर राजकारण करणारे लोक असल्याची टीका पवारांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.