Sharad Pawar Vidhansabha List राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत. लोकसभा निवडणुकांमध्ये शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर वरचढ ठरला होता. पक्षात पडलेल्या फुटीनंतर शरद पवार यांनी राज्यभर भेटीगाठींचा धडाका लावून पुन्हा एकदा आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले.
बारामती लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून ही लढाई कौटुंबिक केली होती. अशा परिस्थितीत, विधानसभा निवडणुकीची चाहूल लागताच शरद पवार या निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात पवार कुटुंबातील उमेदवार देऊन लोकसभेचा वचपा काढणार का, अशी चर्चा सुरू होती.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आज ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत बारामती विधानसभा क्षेत्राचाही समावेश असून, बारामतीतून शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांना संधी दिली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतर्फे यापूर्वीच अजित पवार यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.
यामुळे आता बारामतीत लोकसभा निवडणुकांनंतर पुन्हा एकदा ‘पवार विरुद्ध पवार’ असा सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात युगेंद्र पवार हे भक्कमपणे सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी उभे राहिले होते.
लोकसभा निवडणुका सुरू असतानाच, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा बारामती विधानसभेचा भावी चेहरा म्हणून चर्चा सुरू झाली होती. आज त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत.
दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात देवदत्त निकम | Sharad Pawar Vidhansabha List
शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे दिलीप वळसे पाटील देखील शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्या सोबत गेले होते. वळसे पाटलांचा हा निर्णय शरद पवार यांना चांगलाच जिव्हारी लागला होता. शरद पवार या मतदारसंघात एक आश्वासक चेहरा देण्याच्या शोधात होते, आणि हा शोध देवदत्त निकम यांच्या नावावर येऊन थांबला आहे.
देवदत्त निकम हे दिलीप वळसे पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जात होते, मात्र राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले. अशा परिस्थितीत आता शरद पवार यांच्या पक्षाकडून निकम यांना आंबेगावमधून उमेदवारी दिल्यामुळे, येथे रंगतदार सामना रंगणार असल्याचे दिसत आहे.
एकंदरीतच, महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक रंगतदार होणार आहे. विशेषतः बारामती आणि आंबेगाव विधानसभेच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष असेल.