अमरावती – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज विदर्भ दौऱ्यावर असणार आहेत. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी पवारांच्या मुंबईतील निवासस्थानावर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर पवार यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या पोलिस बंदोवस्तासह शरद पवार आज विदर्भ दौऱ्यावर असणार आहेत.
शरद पवार नागपूर व अमरावती मध्ये असणार आहेत त्यामुळे या दोन्ही शहरात पवारांच्या कार्यक्रमस्थळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. तर नागपूर विमानतळावरही पोलिसांचा फौजफाटा आहे.
अमरावतीमध्ये आज पवारांचा एकदिवसीय दौरा असणार आहे. दुपारी 1 वाजता शरद पवार यांचे अमरावतीत आगमन होईल. ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण व श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या सभागृहाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती लावणार आहेत. त्यानंतर 4.15 वाजता माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी जातील आणि सायंकाळी 5 ते 7 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत.