मदतनिधीसाठी राज्य सरकारपुढे मर्यादा – शरद पवार

खासदारांसह पंतप्रधान मोदींची भेट घेणार

Madhuvan

उस्मानाबाद – परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारपुढे मर्यादा आहेत. त्यामुळे केंद्र सरकारकडून मदत मिळाली पाहीजे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. तसेच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शरद पवार आज नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील सास्तुर येथे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना पवार यांनी ही माहिती दिली.

शरद पवार म्हणाले, अतिवृष्टीमुळे पिकांसह शेतातील मातीही वाहून गेली आहे. हे संकट मोठे आहे. सरकारची सर्व ताकद शेतकऱ्यांच्या पाठीशी लावू. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यास राज्य सरकारला मर्यादा आहेत. त्यामुळे राज्यातील खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन, केंद्राकडे मदतीची मागणी करणार आहे. येत्या 10 दिवसांत आपण दिल्लीला जाणार असल्याचेही पवार म्हणाले.

अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान मोठे आहे. या संकटावर एकत्रितरित्या मात करायला हवी. आपण भूकंपासारख्या संकटाला तोंड दिले आहे. त्यामुळे धीर धरा, अशा शब्दात पवारांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला. पिकांचे झालेले नुकसान, दगावलेली जनावर आणि घरांची झालेली पडझड यासाठी सरकार नक्की मदत करेल, असे आश्‍वासनही पवारांनी शेतकऱ्यांना दिले.

बळीराजाशी “मन की बात’
तुळजापूरमधून शरद पवार यांनी आज आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. यानंतर काकांब्रा, लोहारा, सास्तुरा या गावांचा दौरा करत मार्गक्रमण केले. कांकाब्रा ते सास्तुरादरम्यान शरद पवार यांनी रस्त्यात अनेक ठिकाणी गाडी थांबवून शेतकऱ्यांची विचारपूस केली.

तेव्हा लोहारातील शेतकऱ्यांनी शरद पवार यांच्यापुढे आपली व्यथा मांडली. या शेतकऱ्यांच्या हातात पावसात भिजल्यामुळे वाया गेलेली पिके होती. ही पिके शेतकऱ्यांनी शरद पवार यांना दाखवली. आम्ही दुबार पेरणी केली, पण पावसामुळे ती वाया गेली. त्यामुळे आता किमान पुढील पेरणीआधी पंचनामे होऊन आम्हाला आर्थिक मदत द्या, असे शेतकऱ्यांनी शरद पवार यांना सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.