डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या जागेची करणार पाहणी
मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथील इंदू मिलमध्ये होणाऱ्या प्रस्तावित स्मारकाच्या जागेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार हे उद्या, मंगळवारी भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान पवार डॉ. बाबासाहेबांच्या स्मारक आराखड्याची पाहणीही करणार आहेत.
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने सत्तेत येताच अनेक महत्त्वाच्या कामांना गती देण्याचे काम सुरू केले आहे. यामध्ये इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा समावेश आहे. शरद पवार हे उद्या, दुपारी 3.30 वाजता भेट देणार आहेत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नुकताच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील प्रस्तावित स्मारकाच्या जागेची व आराखड्याची पाहणी केली होती. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन येत्या दोन वर्षांत इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभे करणार असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले होते.
त्याचवेळी त्यांनी या जागेची पाहणी शरद पवारसाहेब करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार इंदू मिलच्या जागेची व आराखड्याच्या कामाची पाहणी शरद पवार करणार आहेत. त्यांच्यासमवेत अल्पसंख्याक मंत्री व मुंबई अध्यक्ष नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत.