ओझर : जुन्नर विधानसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांची जाहीरसभा बुधवार दि. १३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता ओतूर येथील उपबाजार समिती आवारात आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरद लेंडे यांनी दिली.
दरम्यान, जुन्नर तालुक्यावर विशेष लक्ष केंद्रित करून आणि एकाच वर्षाच्या आत ३ वेळा जुन्नर तालुक्यात येऊन जुन्नर विधानसभेसाठी विजयी होणाऱ्या पर्याय उमेदवाराची चाचपणी करणारे शरद पवार साहेब हे ओतूरच्या जाहीर सभेत काय बोलणार, जुन्या उमेदवाराची भाकरी फिरवून त्यांनी दिलेल्या तरुण , तडफदार उमेदवार सत्यशील शेरकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी काय गुगली टाकणार याकडे सर्वच तालुक्याचे लक्ष वेधले आहे.
या जाहीर सभेबद्दल माहिती देताना शरद लेंडे म्हणाले की, या जाहीर सभेसाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहे. या जाहीर सभेत आदिवासी समाज बांधव, शेतकरी वर्ग, महिला भगिनी, बेरोजगार तरुण वर्ग, व्यावसाईक बांधव यांच्या सह सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.
या प्रसंगी ज्येष्ठ नेते अनंतराव चौगुले, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष तुषार थोरात, उपतालुकाप्रमुख मंगेश अण्णा काकडे, माजी नगराध्यक्ष सुनील मेहेर, संभाजी काळे, शिवसेनेचे रशीद इनामदार, नारायणगावचे माजी उपसरपंच संतोष वाजगे आदी मान्यवर उपस्थित होते.