नक्षलवादी हल्ल्यावरून शरद पवारांचे खडे बोल; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी

पुणे – आज महाराष्ट्र दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्साहाचे वातावरण असतानाच गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दादापूर मार्गावर नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणल्याने महाराष्ट्रासह देशभरामध्ये दुःखाची लाट पसरली आहे. नक्षलवाद्यांनी सी-60 कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे भ्याड हल्ला केला असून या हल्ल्यात 15 जवानांसह या ताफ्याचे चालक देखील शहीद झाले आहेत.

दरम्यान, आजच्या या नक्षलवादी हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध केला असून गृह खात्याची जबाबदारी असलेल्या मुख्यमंत्र्यांनी या घटनेनंतर तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून पवारांनी महाराष्ट्र सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. ते म्हणतात, “महाराष्ट्रात नक्षलवाद्यांच्या कारवाया नित्याची बाब झाली आहे. राज्यकर्त्यांकडून नक्षलग्रस्त भागातील कायदा व सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष झाल्याचा हा परिणाम आहे. महाराष्ट्र दिनी गडचिरोलीतील जांभूरखेडा भागात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भुसुरुंगाच्या स्फोटात १६ एसआरपीएफ जवान मृत्यूमुखी पडले.”

“गृहखात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे असल्याने त्यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा. ज्यांना ‘जनाची नाही तरी मनाची’ लाज असते अशांकडून राजीनाम्याचा निर्णय घेतला गेला असता. पण ते आजच्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांकडून होणे नाही. सबब नक्षलवाद्यांच्या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध व मृत्यूमुखी पडलेल्या जवानांबद्दल दु:ख व्यक्त करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.” असं देखील ते आपल्या अधिकृत ट्विटर खात्याद्वारे म्हणाले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.