कोथरूड – रेणू शर्मा प्रकरणाची चौकशी व्हावी. ती कोणत्याही यंत्रणेमार्फत करा, त्याबाबत आमचे काही मत नाही. मात्र, रेणू शर्मा प्रकरणात धनंजय मुंडे यांनी नैतिक जबाबदारी म्हणून स्वत: राजीनामा द्यावा. तसे न झाल्यास पक्षप्रमुख म्हणून शरद पवार यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केली.
रेणू शर्मांबाबत स्वत: मुंडे यांनी कबुली दिली आहे. ती माहिती त्यांनी निवडणूक लढविताना जाहीर केली नव्हती. ही गंभीर बाब आहे. आजपर्यंत देशाच्या राजकारणात ज्या ज्या वेळी लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत, त्या-त्या वेळी सबंधित मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. त्यास मुंडे हे अपवाद ठरू नयेत, अशी अपेक्षाही पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
50 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत शरद पवार यांनी गंभीर प्रकरणात कोणालाही पाठीशी घातलेले नाही. त्यांनी मुंडेंचीही पाठराखण करू नये, असेही पाटील म्हणाले.
मुंडे प्रकरणावरून भाजपमध्ये दोन गट पडले आहेत का? यावर पाटील म्हणाले की, भाजपमध्ये दोन गट नाहीत. या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि मुंडेंनी राजीनामा द्यावा, अशी मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी मागणी केली आहे.
महिला आघाडीचे आज आंदोलन
धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी भाजप महिला आघाडीतर्फे सोमवारी (दि. 18) राज्यभरात प्रत्येकी तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले.