शरद पवारांनी एनडीएसोबत यावे – रामदास आठवले

मुंबई – राज्यात शिवसेनेच्या दबावाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस राहात असून, त्याच्या दबावाला बळी न पडता राष्ट्रवादीने शिवसेनेला दिलेला पाठिंबा काढायला हवा. राज्यात अनेक निर्णय हे राष्ट्रवादीला घेता येत नाहीत. या संपूर्ण प्रक्रियेवर मुख्यमंत्र्यांचा कंट्रोल आहे. देशासह राज्याच्या हितासाठी शरद पवार यांनी एनडीएसोबत यावे, असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख, खासदार रामदास आठवले यांनी व्यक्‍त केले आहे. राज्यात तीन पक्षांचे सरकार असले तरी ही सेना इतर पक्षांचे ऐकत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने शिवसेनेचा पाठिंबा काढून घेतला पाहिजे, असेही त्यांनी सांगिले.

रामदास आठवले म्हणाले, मागील निवडणुकीमध्ये भाजप जर स्वतंत्र लढली असती तर एकहाती सत्ता मिळाली असती. त्यावेळी जर आम्हाला जागा कमी पडल्या असत्या तर आम्ही शरद पवार यांनाच विनंती केली असती आणि त्यांना सत्तेत सामील करून घेतले असते.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने देशाचा विचार करणे अत्यंत आवश्‍यक आहे. शरद पवार हे नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या अनेक भूमिकांना नेहमीच पाठिंबा देत आहेत. शिवसेनेसोबत जाऊन राष्ट्रवादीचा काहीच फायदा नाही. शरद पवार हे एनडीए सोबतच हवे आहेत. शरद पवार जर केंद्रीय मंत्रिमंडळात आले तर त्यांचा अनुभव देशासाठी चांगला ठरेल. राज्याच्या हितासाठीही ते फायदेशीर ठरेल, असेही आठवले यांनी सांगितले.

ठाकरे सरकार अपयशी
राज्यात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत चाललेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे करोनावर उपाययोजना करण्यात कमी पडले आहे. सध्याचे मुख्यमंत्री हे घरात बसून केवळ आदेश देण्यात मग्न आहेत. अशाने या परिस्थितीवर नियंत्रण कसे आणणार, असे म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.

Leave A Reply

Your email address will not be published.