सातारा – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची बऱ्याच कालावधीनंतर बुधवारी नजरानजर झाली. शिवेंद्रराजेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर सार्वजनिक व्यासपीठावर पहिल्यांदाच ते शरद पवार यांच्यासमोर आले होते. या भेटीबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.
आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. ज्यादिवशी शिवेंद्रसिंहराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केला त्याच रात्री शरद पवार यांनी साताऱ्यात मुक्कामी येऊन सगळे पॅचिंग केले होते.
शिवेंद्रराजेंमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला भगदाड पडण्याचा धोका असल्याने पवारांनी अत्यंत सावध भूमिका घेतली होती. साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन सातारा- जावळीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच उमेदवार विजयी होईल, असा दावा पवार यांनी केला होता. शिवेंद्रराजेंपाठोपाठ उदयनराजे यांनीही भाजप प्रवेश केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेससमोर अडचणी वाढल्या होत्या.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. शिवेंद्रराजेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडल्यापासून त्यांची शरद पवार यांच्याशी भेट झाली नव्हती. त्यामुळे पडळ येथे बुधवारी होणाऱ्या कार्यक्रमास शिवेंद्रराजे जाणार का, याची उत्सुकता होती.
पडळ (ता. खटाव) येथे खटाव- माण तालुका ऍग्रो प्रो. लि. कारखान्याच्या दोन लाख 51 हजाराव्या साखर पोत्याच्या पूजनासाठी शरद पवार बुधवारी आले होते. या कार्यक्रमास सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रराजे यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उभयतांची बऱ्याच कालावधीनंतर नजरानजर झाली. विशेष म्हणजे दोघांनीही एकमेकांकडे हसतमुख चेहऱ्याने पाहून हस्तांदोलन केले.
त्यानंतर एकाच व्यासपीठावर ते विराजमान झाले. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या विविध घटनांमुळे आरोप- प्रत्यारोप होत आहेत. कालच उदयनराजे भोसले यांनी जाणता राजा या मुद्यावरुन शरद पवार यांच्यावर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि शिवेंद्रराजे भोसले कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले. या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.