मुंबई – पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे मंगळवारी (दि.27) राज्यातील उसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसदर्भात बैठक पार पडली. बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी ट्विटरवरून शरद पवार यांची स्तुती केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंकजा मुंडेंवर स्तुतीसुमनं उधळली आहे.
नाशिक येथे शरद पवार म्हणाले की, पंकजा या चांगलं काम करत आहेत. उसतोडणी कामगारांच्या प्रश्नावर बैठक असल्याने त्या पुण्यातील बैठकीत हजर होत्या, असे म्हणत शरद पवार यांनी पंकजा मुंडेंचं कोतुक केलं आहे.
दरम्यान, पुण्यातील बैठक संपल्यानंतर पंकजा मुंडे यांनी ट्विट करत शरद पवारांची स्तुती केली होती. पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या, ‘कोरोना च्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले… पक्ष, विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्या विषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबांनी शिकवले आहे, असे ट्विट पंकजा मुंडे यांनी केले होते.
@PawarSpeaks hats off … कोरोना च्या परिस्थितीत इतका दौरा , आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिना चे अप्रूप वाटले … पक्ष ,विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्या विषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबानी शिकवले आहे
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) October 27, 2020
पुण्यात पार पडलेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे शरद पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री धनंजय मुंडे, हर्षवर्धन पाटील, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांसह विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या बसण्याची व्यवस्था ही एकमेकांजवळच करण्यात आली होती. त्या दोघांत चर्चा सुद्धा झाली. तसेच पंकजा मुंडे यांनी शरद पवार यांची स्तुती केली, 24 तास पूर्ण होत नाहीत तोवरच शरद पवार यांनीही पंकजा मुंडेंची स्तुती केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
भाजपावर नाराज असलेल्या एकनाथ खडसेंनी भाजपा सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. पंकजा मुंडे या देखील विधान परिषदेतील पराभवानंतर नाराज होत्या. नुकतीच त्यांची भाजपाच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची नाराजी दूर झाल्याचे समजत होते. मात्र विरोधी पक्षातील नेत्यांची स्तुती केल्याने राजकीय वर्तुळात उलट सूलट चर्चेला उधाण आलं आहे.