सातारा, (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन स्वतंत्र पक्ष झाल्यानंतर फलटण व वाई या दोन विधानसभा मतदारसंघातून हे दोन्ही पक्ष प्रथमच आमनेसामने येत आहेत. सातारा जिल्हा थोरल्या साहेबांना मानतो तर अजित पवार यांना मानणारा कार्यकर्ता वर्ग येथे मोठा आहे. त्यामुळे या दोन मतदारसंघातून कोणत्या पवारांच्या विचारांना साथ मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही बाजूने जिल्ह्यातील मतदारसंघ वाटपाचा विषय संपला आहे. भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठ्या वाई मतदारसंघांमध्ये अजित पवार गटाचे विद्यमान आमदार मकरंद पाटील यांनी दंड थोपटले आहेत. त्यांचे बंधू व जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांना राज्यसभेची खासदारकी देऊन अजित पवार यांनी त्यावेळी मास्टर स्ट्रोक मारला होता.
येथे शरद पवार यांनी बावधन गटातील शशिकांत पिसाळ यांच्या पत्नी सौ. अरुणादेवी पिसाळ यांना उमेदवारी दिली आहे. वाई विधानसभा मतदारसंघांमध्ये पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. शिरवळमध्ये रामराजे यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
तसेच डॉ. नितीन सावंत यांनी सुवर्णगाथा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोठे जाळे विणले आहे. महाबळेश्वर व भुईंजमधून माजी आमदार मदन भोसले यांची ताकद आहे. मदन भोसले यांनी महाविकास आघाडी की महायुती याचे पत्ते अद्याप खुले केलेले नाहीत. या बाबी जुळल्या तर मकरंद पाटील यांना अरुणादेवी पिसाळ यांचे मोठे आव्हान मिळू शकते.
फलटण मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून रामराजे समर्थक विद्यमान आमदार दीपक चव्हाण तर महायुतीकडून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे समर्थक सचिन कांबळे पाटील अजित पवार यांच्या पक्षाकडून रिंगणात आहेत. फलटणमध्ये खरी लढत रामराजे नाईक निंबाळकर विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर अशीच आहे.
आमदार दीपक चव्हाण यांच्यासमवेत रामराजे यांचे सैन्य व काही सरदार शरद पवार यांच्या पक्षात गेले आहेत. तर रामराजे अजूनही अजित पवार यांच्यासमवेत आहेत. मात्र, पक्षीय लेबल जर पाहिले तर पवार विरुद्ध पवार अशी रंगतदार लढत येथे होणार आहे फलटणमध्ये रामराजे म्हणतील ती पूर्व दिशा अशी परिस्थिती दिसत असली तरी दरम्यानच्या काळात बरेच कार्यकर्ते त्यांना सोडून महायुतीमध्ये दाखल झाले आहेत.
येथे आपला वरचष्मा तयार करण्यासाठी अजित पवार यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जवळ केले आहे. त्यामुळे वाई आणि फलटण या दोन मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे.