नवी दिल्ली – महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या वेगवेगळ्या विचारधारांच्या पक्षांना एकत्र आणत शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. देशभरात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ राष्ट्रपतींची भेट घेत हे कायदे मागे घ्यावेत अशी मागणी करण्याच्या रणनीतीमध्येही शरद पवार यांचे प्रमुख योगदान असल्याची माहिती आहे. अशातच आता सोनिया गांधी यांच्यानंतर युपीए अध्यक्षपदाची जबाबदारी शरद पवार यांच्याकडे सोपवली जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
एका नामांकित वृत्तवाहिनेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार शरद पवार यांना आता राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची मोट बांधण्यासाठी महत्वपूर्ण जबाबदारी देण्यात येणार आहे. यासाठीच्या प्राथमिक चर्चेला सुरुवात झाल्याचेही वृत्त आहे.
तत्पूर्वी, बिहार व हैद्राबाद निवडणुकांमध्ये काँग्रेसने केलेल्या निराशजनक कामगिरीनानंतर पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष असावा असा सूर उमटला होता. पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांनी पक्षनेतृत्वावर जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. तर काहींनी राहुल गणशोई यांनी पुन्हा एकदा अध्यक्षपदाची सूत्रे आपल्या हाती घ्यावीत अशी मागणी केली होती. मात्र राहुल गांधी यांनी यापूर्वीच आपण अध्यक्षपद स्वीकारणार नसल्याचं स्पष्ट केलंय.
अशातच आता शरद पवार यांच्याकडे युपीए अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, “राहुल गांधी हे यूपीएचा चेहरा असतील परंतु शरद पवार यांच्या हाती यूपीएच्या अध्यक्षपदाची धुरा असेल. ते सर्वात ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत,” असा दावा करण्यात आलाय.