मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची पहिली यादी जाहीर झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत शरद पवार गटाच्या एकूण 45 उमेदवारांची नावे जाहीर केली. या यादीमध्ये अनेक युवा नेत्यांना संधी देण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या उमेदवारांना थेट शरद पवारांनी उमेदवारी जाहीर केली आहे.
‘या’ 9 जणांना लागली लॉटरी
१) भाग्यश्री अत्राम
धर्मराव अत्राम यांच्या कन्या असलेल्या भाग्यश्री अत्राम यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अहेरीतून उमेदवारी जाहीर केली आहे. धर्मराव अत्राम हे सध्या अजित पवारांसोबत असून ते घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहेत, त्यामुळे अहेरीमध्ये वडील विरुद्ध मुलगी अशी लढत पाहायला मिळणार आहे.
२) संदीप नाईक
बेलापूरमधून भाजपने तिकीट न दिल्यामुळे २ दिवसांपूर्वी संदीप नाईक यांनी तुतारी हाती घेत शरद पवार गटात प्रवेश केला होता. आणि आजच्या पहिल्या यादीमध्ये शरद पवारांनी त्यांना बेलापूरमधून उमेदवारी जाहीर केली आहे.
३) हर्षवर्धन पाटील
इंदापूरची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला गेल्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी भाजपची साथ सोडत शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला. यानंतर शरद पवारांनी इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांना तिकीट जाहीर केले आहे.
४) समरजीत घाटगे
कागलची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला गेल्यामुळे समरजीत घाटगे यांनीदेखील भाजपची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. या मतदारसंघात अजितदादांच्या राष्ट्रवादीत असलेले हसन मुश्रीफ विरुद्ध समरजीत घाटगे अशी होणार आहे.
५) राजेंद्र शिंगणे
सिंदखेडराजाचे आमदार राजेंद्र शिंगणे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा अजितदादांसोबत गेले होते, पण निवडणुकीच्या तोंडावर राजेंद्र शिंगणे पुन्हा स्वगृही परतले आणि आता त्यांना शरद पवारांच्या पक्षाने पुन्हा एकदा सिंदखेडराजामधून उमेदवारी दिली आहे.
६) किशोर जोरगेवार
चंद्रपूरमधून अपक्ष निवडणूक जिंकलेले किशोर जोरगेवार यांनीही काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यानंतर शरद पवारांनी त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
७) बापूसाहेब पठारे
बापूसाहेब पठारे यांना शरद पवारांच्या पक्षाने वडगाव शेरीमधून उमेदवारी जाहीर केली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी बापूसाहेब पठारे यांनी शरद पवारांच्या पक्षाचा प्रचार अर्धवट सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता त्यांनी पुन्हा यु – टर्न घेत शरद पवारांच्या पक्षात पुन्हा प्रवेश केला.
८) विनायकराव पाटील
2019 ला विधानसभा निवडणुकीत भाजपकडून लढलेल्या विनायकराव पाटील यांनाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीने तिकीट दिलं आहे. विनायकराव पाटील हे अहमदपूरमधून निवडणूक लढणार आहे.
९) सुधाकर भालेराव
भाजपमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या सुधाकर भालेराव यांना उदगीरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.