मुंबई – गेल्या अनेक वर्षांपासून पक्षावर नाराज असलेले भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर पक्षाला सोडचिट्ठी दिली. खडसे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर ते येत्या २३ तारखेला राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं राष्ट्रवादीतर्फे जाहीर करण्यात आलं. खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. अशातच आता शिवसेनेचे प्रमुख प्रवक्ते संजय राऊत यांनी खडसेंना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यामागे शरद पवारांची राजकीय गणितं असू शकतात असा अंदाज वर्तवला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
एकनाथय खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबाबत बोलताना संजय राऊत यांनी, “शरद पवार राजकारणातील सर्वात ताकदवान नेते असून त्या पक्षाचे प्रमुख आहेत. ते असं उगाच कोणाला प्रवेश देणार नाहीत. त्यांना त्यांचं महत्त्व पटलं असेल. एकनाथ खडसे यांनी मांडलेली भूमिका मी ऐकली. ती भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल म्हणून त्यांनी प्रवेश दिला. मी शरद पवारांचं आधीचं वक्तव्य ऐकलं ज्यामध्ये त्यांनी जे सोडून गेले आहेत त्यांना परत प्रवेश देणार नाही सांगितलं. इतका कठोर निर्णय़ जर शरद पवार घेऊ शकतात तर त्याच वेळेला भाजपामधील प्रमुख नेत्याला प्रवेश देत आहेत. त्यांची काही राजकीय गणितं असू शकतात” असा अंदाज वर्तवला.
तत्पूर्वी, देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या एकनाथ खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने त्यांना हटवण्यात आलं होत. यानंतर पक्ष आपल्यावर अन्याय करत असल्याचं दुःख खडसे यांनी अनेकदा जाहीररीत्या बोलून दाखवलेलं. अशातच गेल्या काही महिन्यांपासून खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशा चर्चा सुरु होत्या. मध्यंतरी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट देखील घेतली होती. अखेर खडसे यांनी काल भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत या चर्चांवर शिक्कामोर्तब केलं.
यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खडसे शरद पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी २३ तारखेला राष्ट्रवादीत प्रवेश करतील असं जाहीर केलं.