उदयनराजेंची शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून उत्तर
मुंबई – “जगभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची उंची कुणीही गाठू शकणार नाही. मात्र, सध्याच्या काळात “जाणता राजा’ उपमा कुणालाही दिली जाते. मात्र, या जगात छत्रपती शिवाजी महाराजच खरे जाणते राजे आहेत,’ असे सांगत छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.
याच पार्श्वभूमीवर आज मुंबईतील घाटकोपरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून शरद पवार यांचा जाणता राजा असे पोस्टर झळकावण्यात आले आहेत. या पोस्टरमध्ये उदयनराजे यांच्या टीकेला उत्तर देत मुंबईत समर्थकांकडून पोस्टर झळकावण्यात आले आहेत. या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे की, “आपापली राजकीय विचारसरणी निश्चित जोपासा, पण ज्या नेतृत्त्वामुळे महाराष्ट्र जगात ओळखला जातो त्या नेतृत्त्वावर अल्पमाहिती, अल्पज्ञानातून शिंतोडे उडवू नका. शरद पवार साहेब आम्हा तरुणांचे कालही जाणता राजा होते, आजही जाणता राजा आहेत आणि भविष्यातही जाणता राजा राहणारच”. या पोस्टर झळकावल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.